Headlines

कृषी तंत्रज्ञान समजून घेत आधुनिक पद्धतीने शेती करा- डॉ.विलास खर्चे:राहुरी तालुक्यातील गुहा येथे शेतकरी मेळावा उत्साहात, शेतकऱ्यांना मार्गदर्शन




शेतीमध्ये पिकांचे फक्त उत्पादन घेऊन चालणार नाही तर लागवड, खते, निविष्ठा यांच्यावर खूप मोठा खर्च होतो. त्यासाठी पिकांचे लागवडीचे तंत्रज्ञान समजून घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. हरितक्रांतीमुळे धान्याच्या उत्पादनात मोठी क्रांती झाली परंतु जमिनीची सुपीकता कमी झाली. विषमुक्त अन्नाबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत असून शेतकरी गटांनी आपल्या गटाद्वारे कीटकनाशक अंशमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी जैविक निविष्ठांचा वापर करावा. यामुळे उत्पादन खर्चात बचत होईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मदिनाच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व गुहा येथील संत सावतामाळी शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. खर्चे बोलत होते. याप्रसंगी उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. भरत पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. पवन कुलवाल, डॉ. पंडित खर्डे, बापूसाहेब शिंदे, डॉ. शाळीग्राम गांगुर्डे, प्रा. चिमाजी बाचकर, डॉ. विजय शिंदे उपस्थित होते. डॉ. खर्चे म्हणाले, शेती उत्कृष्ट कशी करता येईल हे महत्त्वाचे असून पाणी, जमीन यांसारख्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यावेळी विद्यापीठात आयोजित करण्यात येणाऱ्या थेट पीक प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन पाहण्यासाठी आवर्जून भेट देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकरी गटाने राबवलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यापीठाने तयार केलेल्या फुले सुपर बायोमिक्स माहितीपत्रकाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शेतकरी गटाच्या सदस्यांचा सत्कार कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ सजन यांनी केले तर आभार विश्वनाथ सूर्यवंशी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शेतकरी गटाचे अध्यक्ष दिगंबर शिंदे, प्रगतशील शेतकरी गोरक्षनाथ शिंदे, शेतकरी गटाचे सर्व सदस्य तसेच कनगर येथील कणकावती सोयाबीन शेतकरी गट, दवणगाव येथील स्वामी समर्थ शेतकरी गट, क्रांतीसूर्य महिला शेतकरी गट या गटाच्या सदस्यांसह शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना प्रगत कृषी तंत्रज्ञानाची मिळाली माहिती यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉ. विजय पाटील यांनी पाणी व्यवस्थापन, डॉ. शाळीग्राम गांगुर्डे यांनी भाजीपाला कीड व्यवस्थापन, प्रा. चिमाजी बाचकर यांनी भाजीपाला रोग व्यवस्थापन, डॉ. विजय शिंदे यांनी चारा व्यवस्थापन, विक्रम पाठक यांनी चारा व पाणी व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *