Headlines

कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट उघड:प्रतिस्पर्धी टोळीकडून पोलिस वाहनाचा पाठलाग करून हल्ल्याचा कट




पुणे शहरातील कुख्यात गुंड कृष्णा आंदेकर आणि त्याच्या भाच्यांवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा कट उघडकीस आला आहे. प्रतिस्पर्धी टोळीने त्यांना न्यायालयात नेत असताना पोलिस वाहनाचा पाठलाग करून हल्ला करण्याची योजना आखली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी सूरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ), मानव शरद ढमाले (वय २४), वेदांत रोहित सावंत (वय २१), धीरज लखारा (तिघे रा. धनकवडी) आणि अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, रा. गुजरवाडी, कात्रज) यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. नाना पेठेतील बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीत वर्चस्वाच्या वादातून अनेक वर्षांपासून टोळीयुद्ध सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची सोमनाथ गायकवाड टोळीतील सदस्यांनी हत्या केली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष कोमकर आणि गणेश काळे यांची हत्या केली होती. दोन महिन्यांपूर्वी अक्षय काळे यांच्यावरही पुणे-सातारा रस्त्यावर गोळीबार करण्यात आला होता. कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. कृष्णा आंदेकर, त्याचा मुलगा स्वराज वाडेकर आणि भाऊ तुषार वाडेकर हे सध्या नंदूरबार कारागृहात आहेत. कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांना न्यायालयीन कामकाजासाठी नंदूरबार कारागृहातून शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा नंदूरबार कारागृहात पाठवले जाणार होते. याच दरम्यान, सोमनाथ गायकवाडचा जवळचा साथीदार सूरज ठोंबरे याने आंदेकर आणि वाडेकर यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला. मानव ढमालेच्या सांगण्यावरून वेदांत सावंत, धीरज लखारा आणि अथर्व खोपडे यांनी शिवाजीनगर ते चाकणपर्यंतच्या रस्त्याची पाहणी करून पोलीस वाहनावर हल्ला करण्याची योजना आखली होती. गुन्हे शाखेच्या युनिट दोनला या कटाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. आरोपींना हल्ला करण्यासाठी पिस्तूल पुरवण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *