Headlines

कॅमेऱ्यांच्या पालखीतून संस्कृतीचा जागर; पारंपरिक वेशभूषा:छायाचित्रकारांचा गजर, अमरावतीत दरवर्षी जागतिक छायाचित्र दिनी कॅमेरा दिंडीची परंपरा कायम‎



जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून शहरात यंदाही पारंपरिक पध्दतीने कॅमेरा दिंडी उत्साहात काढण्यात आली. अंबानगरी फोटो-व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीत जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील छायाचित्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येन

.

शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरातून दिंडीची सुरुवात झाली. यावेळी पालखीत ठेवण्यात आलेल्या जुन्या कॅमेऱ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्य आणि छायाचित्रकारांनी पूजन व दिंडीत सहभाग घेतला. डोक्यावर फेटे, मराठमोळी पारंपरिक वेशभूषा आणि हातात कॅमेरे अशा उत्साही वातावरणामुळे परिसराला अक्षरशः उत्सवाचे स्वरूप आले. या दिंडीला वारकरी परंपरेचीही सुरेख जोड मिळाली. बेलोरा येथील वारकरी दिंडी तसेच सावंगा विठोबा येथील अवधुती भजन मंडळी सहभागी झाल्याने टाळ-मृदंगाचा निनाद, भजन-कीर्तनाचा गजर आणि छायाचित्रकारांचा उत्साह यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. पालखीत जुन्या कॅमेऱ्याची मांडणी करून निघालेली ही दिंडी संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनोख्या मिलाफाचे प्रतीक ठरली.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेली दिंडी गांधी चौक, राजकमल चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली. मार्गात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजकमल चौकात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी फुलांचा वर्षाव करण्यात आला, तर वारकरी मंडळींनी विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

दिंडीतील आनंदात छायाचित्रकारांच्या कुटुंबीयांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. फुगडी, नृत्य आणि पारंपरिक खेळांमधून सहभागी झालेल्यांनी आनंदाचा अनुभव घेतला. त्यामुळे हा उपक्रम केवळ छायाचित्रकारांचा कार्यक्रम न राहता कुटुंबीय आणि नागरिकांच्या सहभागाने लोकउत्सवाचे स्वरूप धारण करताना दिसला.

विशेष म्हणजे, दिंडीदरम्यान स्वच्छतेलाही प्राधान्य देण्यात आले. कार्यक्रमाच्या मार्गावर कुठेही कचरा साचू नये यासाठी आयोजकांनी दक्षता घेतली. निर्माण झालेला कचरा प्रकल्प प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी स्वतः गोळा करून कचरा गाडीत टाकला. दिंडीसोबत स्वच्छतेचा संदेश देत शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याचा आदर्शही यानिमित्ताने निर्माण करण्यात आला.

समारोपाच्या कार्यक्रमात दिंडीत सहभागी झालेले सर्व छायाचित्रकार, वारकरी दिंडी, अवधुती भजनी मंडळ, पोलिस प्रशासन, कुटुंबीय आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे असोसिएशनच्या वतीने आभार मानण्यात आले. कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षण टिपणाऱ्या छायाचित्रकारांनी यंदा परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक अभिमानाचा अविस्मरणीय क्षणही टिपला.

२०१२ मध्ये अमरावतीतून प्रारंभ; इतर जिल्ह्यात आयोजन अमरावती शहरात २०१२ पासून सुरू झालेली कॅमेरा दिंडी आता महाराष्ट्रातील विविध भागांत पोहोचली आहे. छायाचित्रकारांच्या कलेला पारंपरिक संस्कृतीची जोड देणाऱ्या या उपक्रमाने राज्यभरातील छायाचित्रकारांना एकत्र आणण्याचे काम केले. जुन्या कॅमेऱ्याला पालखीत स्थान देत निघणारी दिंडी ही छायाचित्रणाच्या बदलत्या प्रवासाची साक्ष ठरते. अमरावतीतून सुरू झालेली ही संकल्पना महाराष्ट्रभर रुजत असल्याचा अभिमान आयोजकांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *