![]()
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने, श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्रांचा ‘महासेल’ श्री संत तुकाराम भवन येथे सुरू झाला आहे. सुरुवातीच्या दोन्ही दिवशी या सेलला भाविक आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. देवाचे वस्त्र आपल्या घरात असावे या श्रद्धेने आणि भावनेने शेकडो महिला व पुरुषांची खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवशी ३०० हून अधिक भाविकांनी महासेलला भेट देऊन वस्त्रांची खरेदी केली. यातून मंदिर समितीला ३ लाख ५२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या दिवशी गर्दीत आणखीच भर पडली; तब्बल ५०० हून अधिक महिला व पुरुष ग्राहकांनी भेट देऊन आवर्जून खरेदी केली. या महावस्त्रांना मोठे धार्मिक आणि भावनिक महत्त्व असल्याने ती प्रसादस्वरूपात आपल्या घरी नेण्यासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. हा महासेल २४ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार असून, भाविकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी केले आहे. या महासेलमध्ये भाविकांसाठी अत्यंत माफक दरात महावस्त्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये साड्या १०५ ते ७,१००, सोहळे व उपरणे २१० ते ३,१००, शेला १०५ ते १,०५० आणि धोतर २१० ते १,०५० या दरात मिळतील. तसेच शाल १०५ ते ३१५ या किमतीत उपलब्ध असून चोळीखण व लुंगी प्रत्येकी २१० दराने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. याशिवाय ब्लाऊज पिस, टॉवेल, टोपी आणि नॅपकीन यांसारख्या वस्तूंची सुरुवात १०५ रुपयांपासून होत आहे. ग्राहकांच्या बजेटनुसार विविध प्रकार आणि दर्जामध्ये वस्तू उपलब्ध असल्याने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Source link
श्रींच्या ‘महावस्त्र महासेल’मधून 3.52 लाख उत्पन्न:पंढरपुरात साड्या, देवाच्या वस्त्रांच्या खरेदीसाठी शेकडो महिला भाविकांची उडाली झुंबड