Headlines

केस दाखल केली म्हणजे तुम्ही निर्दोष ठरत नाही:महाराष्ट्रातील प्रकरणासाठी दिल्लीत याचिका का? चाकणकरांच्या नोटिशीवर रूपाली ठोंबरेंचा पलटवार




नाशिकच्या वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी दिल्ली हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत विरोधकांना नोटिसा पाठवल्याची घोषणा केल्यानंतर, आता यावर त्यांच्याच पक्षातील नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि सडेतोड पवित्रा घेतला आहे. “कोर्टात केस दाखल केली म्हणजे तुम्ही निर्दोष ठरत नाही, जनतेची दिशाभूल करणे बंद करा,” अशा शब्दांत ठोंबरे यांनी चाकणकर यांना थेट आव्हान दिले आहे. रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आशा मिरगे, रूपाली ठोंबरे, सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांना कोर्टाच्या नोटिसा गेल्याचे सांगितले होते. यावर बोलताना रूपाली ठोंबरे म्हणाल्या, “चाकणकर बाई, तुम्हाला कायद्याने अधिकार दिलाय, त्यामुळे तुम्ही कोणतीही याचिका दाखल करू शकता. तुम्ही दिल्ली कोर्टात जी याचिका दाखल केली आहे, त्याची नोटीस आम्हाला मिळाली असून आम्ही ती सन्मानाने स्वीकारली देखील आहे. याबाबतची पोस्ट मी २४ जून रोजीच माझ्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर टाकली होती, ती कोणीही पाहू शकते.” दिल्लीत जाणे हा लपाछपीचा डाव भोंदूबाबा खरात प्रकरण महाराष्ट्रात घडले असून वृत्तवाहिन्यांचे कार्यक्षेत्रही महाराष्ट्र (पुणे/मुंबई) आहे, असे असताना हे प्रकरण जाणीवपूर्वक दिल्ली कोर्टात नेण्यावर रूपाली ठोंबरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. “भोंदू बाबा खरातचे संपूर्ण प्रकरण आणि वृत्तवाहिन्यांचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रातील आहे. तरीही चाकणकर यांनी जाणीवपूर्वक ही याचिका दिल्लीत दाखल केली आहे. तुम्हाला महाराष्ट्रातही याचिका दाखल करता आली असती, परंतु हा तुमचा कायदेशीर ‘लपाछपीचा डाव’ आहे. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी आणि कायदेशीर चौकटीत न बसणारी ही याचिका तुम्ही दिल्लीत का दाखल केली, हे मी येणाऱ्या काळात समोर आणेन,” असा इशारा ठोंबरे यांनी दिला. १० जुलैच्या सुनावणीला स्वत: हजर राहणार रूपाली ठोंबरे यांनी स्वतः वकील असल्याचा दाखला देत रूपाली चाकणकर यांना १० जुलैच्या सुनावणीसाठी जाहीर आव्हान दिले. “मी स्वतः वकील असल्यामुळे या केसच्या सुनावणीसाठी दिल्ली कोर्टात स्वतः हजर राहणार आहे. पोलिसांच्या तपासातून ज्या गोष्टी समोर आल्या, त्यावरच आम्ही बोललो आहोत.” नशीब डोनाल्ड ट्रम्प कडून नोटीस पाठवली नाही “तुम्ही आम्हाला अमेरिकेतून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून जरी नोटीस पाठवली असती, तरी आम्ही तिथे कायदेशीर लढा लढायला आलो असतो. ही कायदेशीर लढाई आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणारच. काळजी करू नका, १० जुलैला कोर्टात भेटूच! तुम्ही तरी नक्की या!” असा टोला रूपाली ठोंबरे यांनी लगावला. महिला आयोगावर बसून महाराष्ट्राचे नुकसान केले शेवटी, रूपाली चाकणकर यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळावर टीका करताना ठोंबरे म्हणाल्या की, “ज्या व्यक्तीला कायदा समजत नाही, अशा व्यक्तीला महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसवून महाराष्ट्राचे आणि संपूर्ण महिला वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे. कोर्टात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *