Headlines

कैलासनगर स्मशानभूमी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न:सीएसएन फर्स्ट-महानगरपालिका संयुक्त विद्यमाने आधुनिक 'वैकुंठ धाम' उभारणार; एका वर्षात पूर्ण




छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक कैलासनगर स्मशानभूमीच्या सर्वांगीण पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन रविवार, २६ जुलै रोजी संपन्न झाले. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे आणि स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती होती. कैलासनगर स्मशानभूमी ही शहरातील सर्वात जुन्या स्मशानभूमींपैकी एक आहे. या संपूर्ण परिसराचा आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुसज्ज विकास करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि सीएसएन फर्स्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रकल्पाची उभारणी व नियमित देखभाल करण्याची जबाबदारी सीएसएन फर्स्ट स्वीकारणार असून, सर्व नागरी सेवा महानगरपालिकामार्फत उपलब्ध करून दिल्या जातील. या प्रकल्पासाठी सीएसएन फर्स्टच्या प्रतिनिधींनी हैदराबाद, पुणे आणि गुजरात येथील आधुनिक स्मशानभूमींचा अभ्यास केला आहे. त्यातील सर्वोत्तम संकल्पनांचा यात समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पात १२ आधुनिक अग्नीसंस्कार केंद्रे, विद्युत शवदाहिनी, लँडस्केपिंग, शिवमूर्ती, पाण्याची टाकी, स्वच्छतागृहे, पार्किंग, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, हरित क्षेत्र, बैठकीची व्यवस्था आणि इतर अत्यावश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की, स्थानिक प्रशासन, नागरी संस्था आणि सीएसआरच्या सहकार्याने असे समाजोपयोगी प्रकल्प उभे राहणे ही काळाची गरज आहे. शहरातील नागरी सुविधांना प्राधान्य देत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. महापौर समीर राजूरकर यांनी शहराच्या विकासासाठी सामाजिक संस्थांनी प्रशासनासोबत पुढाकार घेऊन काम करण्याचे आवाहन केले. शहराच्या विकासात नागरिकांचा आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, सीएसएन फर्स्टने घेतलेला हा पुढाकार इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक अखेरचा निरोप मिळणे हा त्याचा अधिकार आहे. याच भावनेतून त्यांनी या प्रकल्पासाठी पहिली देणगी जाहीर केली. सीएसएन फर्स्टचे माजी अध्यक्ष ऋषी बागला यांनीही प्रारंभीची देणगी देऊन या उपक्रमाला पाठबळ दिले. या प्रसंगी सीएसएन फर्स्टचे माजी अध्यक्ष ऋषी बागला, प्रीतीश चॅटर्जी, मुकुंद कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख अनिल माळी, गुरप्रीत सिंग बग्गा, हबीब शेख, दुष्यंत पाटील, हेमंत लांडगे, स्थानिक नगरसेवक रामेश्वर भादवे, नरेश भालेराव, राजू वाडेकर, नितीन सांगळे, मनपा शहर अभियंता संजय कोंबडे, निखिल भालेराव, ललित जाधव, ऋषिकेश डोंगावकर, प्रकल्पाचे वास्तुविशारद महेश साळुंके आणि स्मशानजोगी सुभाष गायकवाड यांची उपस्थिती होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *