Headlines

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आज पुण्यात एल्गार:दिल्लीतील आंदोलनानंतर आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार विद्यार्थी




दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन करणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अभिजीत दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ११ जून रोजी पुण्यात होणाऱ्या आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी होणार आहेत.” त्यामुळे या आंदोलनाकडे राज्यभरातील विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दिल्लीप्रमाणेच पुण्यातही हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमके आंदोलन कशासाठी? कॉकरोच जनता पार्टीचा आरोप आहे की, देशातील स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक व्यवस्थेतील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थी व युवक त्रस्त आहेत. विशेषतः नीट परीक्षा, सीबीएसई निकालांशी संबंधित वाद आणि विविध भरती प्रक्रियांतील कथित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. दिल्लीतील आंदोलनाने वेधले होते देशाचे लक्ष 6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने पहिले मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली होती. आंदोलनात शेकडो विद्यार्थी, युवक आणि पालक सहभागी झाले होते. अनेक आंदोलकांनी कॉकरोचचे मुखवटे घालून निषेध नोंदवला होता. आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडले आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली. ‘कॉकरोच जनता पार्टी’ची सुरुवात कशी झाली? गेल्या काही आठवड्यांत सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय झालेल्या या चळवळीची सुरुवात व्यंगात्मक स्वरूपात झाली होती. काही वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची संकल्पना पुढे आणली. बेरोजगारी, शिक्षणातील समस्या आणि युवकांच्या वाढत्या असंतोषाला आवाज देण्याचा प्रयत्न म्हणून ही चळवळ उभी राहिल्याचा दावा केला जातो. अल्पावधीतच या मोहिमेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला. पुण्यातील आंदोलनाचे ठिकाण कोणते? अभिजीत दिपके यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर महाराष्ट्रातील हे पहिले मोठे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. विद्यार्थी संघटना आणि युवकांचा सहभाग वाढवण्यावर आयोजकांचा भर असल्याचे सांगितले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *