Headlines

कौशल्याधिष्ठित शिक्षण आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक:सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांचे मत




सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी म्हटले आहे की, आत्मनिर्भर भारतासाठी आणि २०२७ पर्यंत विकसित देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, कौशल्याची जोड मिळाल्यास आत्मविश्वास, रोजगार आणि समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. दगडूशेठ गणपती ट्रस्ट या गरजेनुसार कार्यरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ‘जय गणेश ज्ञानवर्धन अभियान’ अंतर्गत ‘जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजना माजी विद्यार्थी मेळावा’ आणि विविध स्किलिंग कोर्सेस प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विजय भालेराव, राजाभाऊ कदम, ज्ञानदीप अकॅडमीचे महेश शिंदे, राजाभाऊ पायमोडे, विलास रासकर, विश्वास पलुसकर आदी मान्यवर उपस्थित होते. १०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला. ट्रस्टतर्फे चालवण्यात येणाऱ्या ७५ हून अधिक स्किलिंग कोर्सेसमधील १०० विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यामध्ये आरी वर्क, नेल आर्ट, फॅब्रिक पेंटिंग, मेहंदी आणि ब्युटिशियन यांसारख्या विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा समावेश होता. या कोर्सेसमुळे तरुणींना आत्मनिर्भर बनण्यास मदत होत असून, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. डॉ. हिरेमठ यांनी पुढे सांगितले की, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विज्ञानावर आधारित संशोधन आणि नवीन स्टार्टअप्सची निर्मिती आवश्यक आहे. यासाठी सरकारकडून मोठे सहकार्य आणि सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यांनी तरुणाईला मोबाईलच्या अतिवापरातून बाहेर पडून वेळेचा सदुपयोग करण्याचे आवाहनही केले. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी माहिती दिली की, २०१० पासून सुरू असलेल्या पालकत्व योजनेत ६० हून अधिक शाळांचा समावेश आहे. कौशल्य वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. समाजात वाढणाऱ्या मानसिक विकृतींच्या पार्श्वभूमीवर, आजच्या पिढीत चांगले संस्कार आणि मूल्ये रुजविण्यावर भर दिला जात आहे. या योजनेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. या कोर्सेसमध्ये केवळ तांत्रिक प्रशिक्षणच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणही विकसित केले जातात, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *