![]()
स्वातंत्र्योत्तर भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने केंद्र सरकारला याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. 4 मे 2026 पूर्वी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आदेश देत न्यायालयाने या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे 74 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सन्मानाला अखेर न्याय मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या प्रकरणी ‘कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन’च्या वतीने नोव्हेंबर 2025 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारच्या विलंबित भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. इतक्या मोठ्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात झालेला उशीर योग्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळेच हा सन्मान इतकी वर्षे रखडल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले. खाशाबा जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी दीर्घ संघर्ष केला आहे. विशेषतः त्यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. 2017 मध्ये पद्मविभूषणसाठीची शिफारस असलेली फाईलच हरवल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. राज्य सरकारकडून शिफारस केली जाईल, असे आश्वासन मिळाले होते, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. खाशाबा जाधव हे भारतीय कुस्ती इतिहासातील एक महत्त्वाचे नाव आहे. 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दादासाहेब जाधव हेही नामांकित पैलवान होते आणि त्यांच्याकडूनच खाशाबांना कुस्तीचे धडे मिळाले. पुढे त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून शिक्षण घेतले आणि त्याच काळात बाबुराव बाळवडे तसेच बेलपुरी गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले. स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक 1948 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सहभाग घेतला, मात्र त्यावेळी त्यांना यश मिळाले नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकसाठी कठोर मेहनत घेतली. आर्थिक अडचणी असूनही गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून त्यांना मदत केली. या स्पर्धेत त्यांनी जर्मनी, कॅनडा आणि मेक्सिकोच्या खेळाडूंना पराभूत करत कांस्यपदक पटकावले. स्वतंत्र भारतासाठी हे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरले आणि देशाचा अभिमान वाढवला. जाधव यांच्या योगदानाला न्याय मिळणार अशा या महान खेळाडूचे 14 ऑगस्ट 1984 रोजी निधन झाले. त्यांच्या कामगिरीला योग्य तो सन्मान मिळावा, ही मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता न्यायालयाच्या आदेशामुळे या मागणीला बळ मिळाले आहे. येत्या काही दिवसांत केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेतल्यास खाशाबा जाधव यांच्या योगदानाला उशिरा का होईना, पण योग्य न्याय मिळणार आहे.
Source link
खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याचे न्यायालयाचे आदेश:74 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार! कोर्टाचा केंद्राला झटका; ‘पॉकेट डायनॅमो’ला अखेर न्याय