![]()
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सध्या जायकवाडीत ४७,४०५ क्युसेक (सुमारे १३ लाख ४२ हजार ३५७ लिटर प्रति सेकंद) वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. अवघ्या ४ दिवसांत तब्बल ४८१.३८ दलघमीहून अधिक पाण्याची आवक झाली आहे. २२ जुलै रोजी ३१ टक्के असलेला उपयुक्त जलसाठा रविवारी (२६ जुलै) रात्री ९ वाजेपर्यंत ५३.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ७९.२५ टक्क्यांवर होता. एल निनोचे सावट आणि मान्सूनच्या उशिराच्या आगमनानंतरही धरण निम्म्याहून अधिक भरल्याने मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि उद्योगांचाही पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. धरणातील उपयुक्त जलसाठा १,१४४.९०४ दलघमी, तर एकूण जलसाठा १,८८३.०१० दलघमी इतका झाला आहे. गतवर्षी २६ जुलै रोजी धरणाची उपयुक्त पाणीपातळी १७२०.४९ दलघमी (७९.२५%) होती. तहान भागवणारे गोदावरी खोरे गोदावरीचे खोरे एकमेकांशी जोडलेले असल्याने नाशिकमध्ये पाऊस झाल्यास मराठवाड्याची तहान भागते. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणे भरल्यानंतर अतिरिक्त पाणी गोदावरी पात्रात सोडले जाते. हे पाणी नाशिकमधील नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून थेट पैठणच्या जायकवाडी (नाथसागर) धरणात पोहोचते. जायकवाडीची एकूण पाणी साठवण क्षमता २,८८८.३१ दलघमी (२,१५२.०८ दलघमी उपयुक्त) आहे. ३१ जुलैपर्यंत पावसाची उघडीप बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकणार असल्याने अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे येणारे मान्सून वारे कमकुवत होत आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ जिल्हे अशा एकूण १८ जिल्ह्यांत ३१ जुलैपर्यंत पावसाला उघडीप राहू शकते. माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ जलसाठा आणखी वाढणार… गोदावरीच्या वरच्या खोऱ्यात म्हणजेच नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने तेथील धरणसाखळीतून विसर्ग सुरू आहे. नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातूनही पाणी गोदावरीत सोडले जात असून गंगापूर, कडवा, पालखेड, दारणा या धरणांमधूनही विसर्ग सुरू आहे. परिणामी जायकवाडीतील पाण्याची आवक कायम राहणार असून साठ्यात आणखी वाढ होऊ शकते. -मंगेश शेलार, शाखा अभियंता वरच्या धरणांतील विसर्ग क्युसेकमध्ये
(कंसात लिटर प्रतिसेकंदप्रमाणे)
गंगापूर ४,९४७ (१ लाख ४० हजार ५८ लिटर)
कडवा ६,२१६ (१ लाख ७६ हजार ३१ लिटर)
भावली ९४८ (२६ हजार ८४४ लिटर)
पालखेड ४,९५६ (१ लाख ४० हजार ३३८ लिटर)
ओझरखेड १,२५२ (३५ हजार ४५२ लिटर)
दारणा १३,२५० (३ लाख ७५ हजार १९६ लिटर)
नांदूर- ४३,०३८ (१२ लाख १८ हजार लिटर) मधमेश्वर (२६ जुलै, रात्री ९ वाजेपर्यंतची आकडेवारी)
Source link
खुशखबर!:जायकवाडी 53%भरले; सेकंदाला 13 लाख लिटर पाणी आवक, नाशिकच्या विक्रमी पावसाने संभाजीनगरला दिलासा,