![]()
गंगापूर शहरातून छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, नाशिक मुंबईला जाणाऱ्या प्रमुख महामार्गावर मागील अनेक महिन्यांपासून साईटपट्टेच नसल्याने भरधाव चालणाऱ्या वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने नियमित अपघात होत असून ते रोखण्यासाठी तत्काळ पांढरे साईटपट्टे, झेब्रा क्रॉसिंग टाकावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भेंडाळा फाटा ते गंगापूर व गंगापूर ते वैजापूर या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर दररोज हजारो अवजड व इतर वाहने धावत असतात. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून या रस्त्यावर असलेले साईड पट्टे पुसून गेले आहेत. रस्त्यावरील पांढरे पट्टे हे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. परंतु हे पट्टेच नसल्यामुळे रस्ता दिशाहीन होउन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय रस्त्याच्या मध्यभागी किंवा बाजूंना पांढरे पट्टे नसल्यामुळे चालकांना स्वतःच्या वाहनाची योग्य लेन समजत नसल्याने वाहने चुकीच्या बाजूने धावून समोरासमोर धडक होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज येत नसल्याने पांढरे पट्टे रिफ्लेक्टीव्ह असतात, जे गाडीच्या हेडलाईटमुळे चमकतात आणि वळण किंवा रस्ता कुठे संपतो हे दर्शवत असतात परंतु ते नसल्याने रस्ता न दिसल्याने वाहने थेट रस्त्याच्या खड्ड्यात गेल्याने अपघात होत आहे. या रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारलेले नसल्याने गतिरोधक वाहनचालकांना वेळेत दिसत नाहीत व अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून येणारे वाहन धडकून दुचाकीस्वार जोरात पडून अपघात होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराने तत्काळ साईटपट्टे टाकून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गंगापूर ते वैजापूर व भेंडाळा रस्ता. यावर पांढरे पट्टे नाहीत. सर्व रस्त्याचे सोबतच पट्टे मारण्यात येणार या रस्त्याच्या दुरूस्तीचे महालगावपर्यंत काम झाले असून, महालगाव ते वैजापूर दुरूस्तीचे काम बाकी आहे. ते झाल्यानंतर सर्व रस्त्याचे सोबतच पट्टे मारण्यात येणार आहे. – सागर दहाडे, के.टी. संगम, कंत्राटदार अधिकारी.
Source link
गंगापूर ते वैजापूर-भेंडाळा रस्त्यावर साईड पट्टे टाकण्याची नागरिकांनी केली मागणी:या मार्गावर दररोज अपघात होत असल्याने वाहनधारकांत नाराजी