![]()
रामायणाची रचना गीतरूपात करून जगभरातील रामभक्तांच्या हृदयात स्थान मिळवणारे आधुनिक वाल्मीकी, दिवंगत कवी गदिमा ऊर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या मालमत्तेवरून त्यांच्याच कुुटुंबात ‘रामायण’ घडत आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील त्यांचे निवासस्थान ‘पंचवटी’ पाडून ती जागा बिल्डरला देण्याचा वाद पेटला आहे. यात गदिमांच्या सूनबाई शीतल श्रीधर माडगूळकर आणि नातू सुमित्र यांनी सोशल मीडियावरून परस्परांवर गंभीर आराेप केले आहेत. शिवाजीनगर हा पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा निवासी, व्यावसायिक विभाग आहे. पंचवटी हे माडगूळकरांचे निवासस्थान हायवेजवळ सुमारे ७५०० हजार चौरस फूट जागेत आहे. येथे प्रति चौरस फूट सुमारे २५,००० रुपये असा बाजारभाव आहे. त्यानुसार ही जागा किमान १८ कोटी ७५ लाख रुपयांची आहे. बाळा आता तरी सुधर…खोटे वागण्याचे बंद कर : शीतल माडगूळकरांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. त्यात त्यांनी आपला मुलगा सुमित्रला उद्देशून म्हटले आहे की, जेव्हा पंचवटीला रंग द्यायला हवा होता तेव्हा बाबांना (श्रीधर) पैसे तर दिले नाहीसच, पण विरोधच केलास. पंचवटीचा पुढचा भाग पडायला आला होता तेव्हा बाबांनी आणि काकांनीच तो दुरुस्त केला होता. पंचवटीसाठी बिल्डर बघायला तूच पुढे होतास. जेव्हा तुला कळले की, बाबांनी (श्रीधर) हे माझ्या नावावर केले आहे तेव्हा तू ५० टक्के तुला हवेत, असे सांगितलेस. पंचवटीच्या भिंतींनी कधीही ऐकली नाही अशी अर्वाच्य भाषा तू स्वतःच्या आईला, बहिणीला आणि मेहुण्याला वापरलीस. बाळा, आता तरी सुधर. खोटे वागण्याचे बंद कर. अजून वेळ गेलेली नाही. सुमित्र माडगूळकरांनी आईच्या आरोपाला उत्तर देताना म्हटले की, ‘गदिमांनी हयात असताना असे म्हटले होते की, जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे तोपर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील. मात्र गदिमांची पवित्र वास्तू ‘पंचवटी’ केवळ पैशांसाठी पाडावी, बिल्डरला विकावी, असा दबाव आमच्या घरातील जवळच्या नातेवाइकांकडून सुरू आहे. गदिमांची वास्तू मी पाडू अथवा विकू देणार नाही. ज्या वास्तूत गीतरामायण लिहिले गेले. हिंमत असेल तर गदिमांच्या पंचवटीला हात लावून दाखवा. तुम्हाला माझे चॅलेंज आहे.’ शासन वास्तू वाचवू शकते तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्र शासनाच्या आदेशावरून पुणे मनपाने गदिमांच्या निवासस्थानाला ‘हेरिटेज’ यादीत समाविष्ट केल्यास ते पाडता येणार नाही. सध्या ‘पंचवटी’ हेरिटेज यादीत नाही. सरकार गदिमांच्या स्मारकासाठी ही जागा ताब्यात घेऊ शकते, पण त्यासाठी जमीन मालकांना बाजारभावाने मोबदला द्यावा लागेल. नगररचना कायदा कलम ६८ नुसार मनपा विकास आराखड्यात फेरबदलाने ही जागा ‘सांस्कृतिक केंद्र’ म्हणून आरक्षित करू शकते.
Source link
‘गदिमां’चे घर विकण्यावरून ‘रामायण’:ग. दि. माडगूळकरांच्या सूनबाई, नातवात आराेप-प्रत्याराेप