Headlines

गावोगावी पहाटे टाळ-मृदंगाच्या गजरात काकडा आरतीचा जागर:ज्येष्ठांसह लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग




गुलाबी थंडीची पहाट, गावातील शांत वातावरण आणि त्यात घुमणारा टाळ-मृदंगाचा आवाज… अशा भक्तिमय वातावरणात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गावोगावी काकडा आरतीचा जागर सुरू आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत महिनाभर चालणाऱ्या या परंपरेत पहाटे ब्राह्ममुहूर्तावर भाविक मंदिरात एकत्र येतात. अभंग, भजन आणि टाळ-मृदंगाच्या गजरात देवाची आरती केली जाते. विशेष म्हणजे, शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या या वारकरी परंपरेत ज्येष्ठांसोबत तरुण आणि लहान मुलेही उत्साहाने सहभागी होत आहेत. महाराष्ट्रात कार्तिक महिन्यात काकडा आरती करण्याची जुनी वारकरी परंपरा आहे. पहाटे स्नान करून भाविक मंदिरात एकत्र येतात. घंटानाद, टाळ, मृदंग, नगारा आणि शंखनादाने देवाला जागे केले जाते. तुळशीची वाळलेली काडी घेऊन तिला कोऱ्या कापडाची चिंधी गुंडाळली जाते. ही काडी तेल किंवा तुपात भिजवून काकडा तयार केला जातो. त्याच्या प्रकाशात देवाची आरती केली जाते. काकडा जळल्यानंतर त्याची काजळी कांस्याच्या पात्रावर जमा केली जाते. या काजळीची भुकटी करून तयार होणाऱ्या पदार्थाला बुक्का म्हणतात. वारकरी आणि भाविक हा बुक्का कपाळावर लावतात. कार्तिक महिन्याला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून, स्कंदपुराणातही या महिन्याचे महत्त्व सांगितले आहे. या काळात गावातील महिलांचीही पहाटेपासून तयारी सुरू असते. महिला घरासमोर सडा-रांगोळी काढतात, आरतीचे ताट सजवतात आणि तुळशी वृंदावनासमोर दिवा लावतात. काही महिला घराच्या अंगणात चौरंगावर देवदेवतांची प्रतिमा ठेवून समई प्रज्वलित करतात. दिंडीची वाट पाहत असताना अंगणातील रांगोळी आणि समईच्या प्रकाशामुळे वातावरण प्रसन्न होते. अभंग म्हणत, हातात भगवे झेंडे घेऊन भाविक टाळ-मृदंगाच्या गजरात गावातील गल्लीबोळांतून दिंडी काढतात. दिंडी घरासमोर पोहोचल्यावर देवप्रतिमेची पूजा करून अभंग म्हटला जातो. त्यानंतर दिंडी पुढील घराकडे मार्गस्थ होते. वाटेतील मंदिरांमध्येही देवाच्या मूर्तीला स्नान घालून पूजा केली जाते. दिंडीचा ठरलेला मार्ग पूर्ण झाल्यानंतर सर्व भाविक पुन्हा मंदिरात एकत्र येतात. ज्ञानोबा माउली, तुकारामाच्या जयघोषात आरती केली जाते. त्यानंतर भजने, स्तोत्रे, कृष्णाच्या बाललीलांची गीते आणि गवळणी म्हटल्या जातात. या सामूहिक भक्तीत स्त्री-पुरुष, लहान-मोठा असा कोणताही भेद राहत नाही. थंडीच्या पहाटे एकत्र येऊन अभंग म्हणण्याचा आनंद आणि मनाला मिळणारी शांतता यामुळे भाविकांची उपस्थिती कायम आहे. आजच्या मोबाईलच्या युगातही पहाटे टाळ-मृदंगाच्या आवाजाने दिवसाची सुरुवात होत आहे. काकडा आरतीच्या माध्यमातून लहान मुलांना अभंग, भजन आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेची ओळख होते. काकडा आरतीचा प्राचीन इतिहास ‘काकडा’ हा शब्द मूळचा वारकरी संप्रदायातील असून, पूर्वीच्या काळी अंधाऱ्या पहाटे मंदिरात किंवा दिंडीत मार्गक्रमण करण्यासाठी आणि देवाच्या मूर्तीचे दर्शन स्पष्ट व्हावे यासाठी मशालीसारखा पेटता काकडा वापरला जाई. ही परंपरा शेकडो वर्षे जुनी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *