Headlines

गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने साडेआठ लाखांची सायबर फसवणूक:महिलेसह दोघांना गंडा, मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल




पुणे शहरात गॅस देयक अद्ययावत (अपडेट) करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेसह दोघांची साडेआठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी अलंकार आणि मुंढवा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एरंडवणे येथील हिमाली सोसायटीत राहणाऱ्या एका ४९ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी लक्ष्य केले. गॅस पुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीच्या नावाने त्यांना एक संदेश पाठवण्यात आला. गॅस देयक अद्ययावत न केल्यास गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर चोरट्यांनी गॅस देयकाची बनावट एपीके फाईल पाठवून महिलेच्या बँक खात्याची माहिती मिळवली. मोबाईल क्रमांक हॅक करून त्यांच्या खात्यातून ४ लाख ९७ हजार रुपये काढून घेतले. पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतरित झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी एका तरुणाची ३ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सागर गोडे अधिक तपास करत आहेत. गेल्या वर्षभरापासून गॅस आणि वीज देयक अद्ययावत करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या संदेशांकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक पुणे बँक खाते अद्ययावत (अपडेट) करण्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका राष्ट्रीयकृत बँकेतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. बँक खाते अद्ययावत न केल्यास खाते बंद पडेल, अशी बतावणी चोरट्यांनी केली. त्यानंतर बँक खाते अद्ययावत करण्याचा बतावणी करुन चोरट्यांनी बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून पाच लाख ९९ हजार रुपये लांबविले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एन मंडले तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *