Headlines

नांदेडमध्ये जावयाकडून खंजीरने वार करून सासूचा खून:पत्नीवर संशय, पत्नीही गंभीर जखमी, आरोपी फरार




पत्नीवर संशय घेऊन सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर धारदार खंजीरने हल्ला करून तिचा खून केल्याची घटना शनिवारी नांदेड शहरातील शहीदपुरा भागात घडली. या हल्ल्यात आरोपीची पत्नीही गंभीर जखमी झाली असून, हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. नांदेडमधील शहीदपुरा भागातील लकी सिंग गणपत सिंग मिलवाले (35) याचे पत्नी गुरुप्रीत कौर लकी सिंग मिलवाले (30) हिच्याशी काही दिवसांपासून वाद सुरू होता. तो पत्नीवर संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. शनिवारी याच कारणावरून आरोपीचे पत्नी व सासूशी कडाक्याचे भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या लकी सिंग याने धारदार खंजीरने सासू बलजीत कौर कुलदीप सिंग सिद्धू यांच्यावर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने पत्नी गुरुप्रीत कौर हिच्यावरही हल्ला केला, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, फरार आरोपी लकी सिंग याचा पोलिस शोध घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी गुरुप्रीत कौर यांना तातडीने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर बलजीत कौर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टम) विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, नांदेड शहरात खुनाची मालिका सुरूच आहे. गेल्या आठ दिवसांत पाच जणांचे खून झाले आहेत. 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वाजेगाव येथील एका तरुणाचा मृतदेह हस्सापूर शिवारात आढळून आला आहे. त्यामुळे त्या युवकाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याचा शोध वजिराबाद पोलिस घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *