Headlines

महात्मा फुले यांचे विचार‎कृतीत आणण्याची गरज‎:मोहाडीत व्याख्यानमालेत हेरंब कुलकर्णी यांचे प्रतिपादन




दिंडोरी ​महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधवा पुनर्विवाह, अनाथ बालकांचे संगोपन व पुनर्वसन तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. मात्र, आजही समाजातील अनेक प्रश्न कायम असल्याने महात्मा फुलेंच्या विचारांची आणि कार्याची आज पूर्वीइतकीच गरज आहे. आपण महात्मा फुलेंचे फक्त विचार न ऐकता ते कृतीत आणण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध संशोधक व लेखक हेरंब कुलकर्णी यांनी केले. तालुक्यातील ​मोहाडी येथील गोपालकृष्ण देवस्थान ट्रस्ट आयोजित व कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन संयोजित श्रीकृष्ण व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘महात्मा फुले आजच्या संदर्भात’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते. व्यासपीठावर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी, पिंपळगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश मोरे, भाजप ग्रामीण उपाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हे व्याख्यान कै. अरुणराव यशवंत मोगरे यांच्या स्मरणार्थ अर्पण करण्यात आले होते. हेरंब कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन मानले. त्यांनी स्त्रीशिक्षण आणि वंचित घटकांसाठी केलेले कार्य आजही मार्गदर्शक आहे. विशेषतः वंचित घटक व एकल मातांच्या मुलांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याची जबाबदारी शिक्षण संस्था व समाजाने स्वीकारली पाहिजे, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा. विलास देशमुख, सूत्रसंचालन धनंजय वानले यांनी केले तर आभार प्रा. धनंजय देशमुख यांनी मानले. श्रीकृष्ण व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘महात्मा फुले आजच्या संदर्भात’ या विषयावर गुंफताना संशोधक व लेखक हेरंब कुलकर्णी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *