![]()
कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक आहे; मात्र भीतीपोटी तपासणी टाळणे योग्य नाही. कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास उपचारांचे परिणाम अधिक चांगले मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात कोणताही असामान्य बदल जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यसनांपासून दूर राहणे, आरोग्याबाबत जागरूकता या गोष्टी कॅन्सरविरोधातील लढ्यात महत्त्वाच्या आहेत. आरोग्याची समस्या लहान आहे असे गृहीत धरून त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी करून योग्य निदान करून घेणे हा उपचारातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे असे प्रतिपादन डॉ. अनिकेत शिंदे यांनी केले. श्री आनंदऋषी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरांच्या उपक्रमांतर्गत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ११० रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेत वैद्यकीय मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन आयोजक स्व. मानकचंदजी संकलेचा व स्व. कमलाबाई संकलेचा यांच्या स्मरणार्थ विजय संकलेचा, साधना संकलेचा, सिद्धार्थ संकलेचा, कियाना संकलेचा, हितार्थ संकलेचा, राजेंद्र संकलेचा, संजय संकलेचा तसेच संकलेचा परिवाराच्या हस्ते करण्यात आले.
Source link
वेळेत निदान अन् नियमित तपासणीनेच कॅन्सरवर मात:डॉ. शिंदे यांचे प्रतिपादन, शिबिरात 110 रुग्णांची तपासणी