![]()
सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हीच सक्षम राष्ट्राची खरी ताकद असून विद्यार्थ्यांनी चिकित्सक विचारसरणी विकसित करून विवेकाच्या आधारावर निर्णय घेण्याची सवय अंगीकारावी, असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्या जे. पी. डमरे यांनी केले.
.
बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना दिवस व राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. बी. कदम होते. प्रारंभी वाणिज्य विभागप्रमुख प्रा. के. बी. चपटे यांनी विद्यार्थ्यांना सद्भावना शपथ दिली. ग्रंथपाल ज्योती यादव यांनी प्रास्ताविक केले.यावेळी डमरे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व पटवून देताना अंधश्रद्धा, अफवा आणि गैरसमज यापासून दूर राहण्याचे आवाहन केले. कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आणि प्रश्न विचारण्याची सवय लावून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी समाजातील विविध घटकांमध्ये बंधुभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. जात, धर्म, भाषा किंवा प्रांताच्या आधारावर भेदभाव न करता सर्वांशी समानतेने वागणे हीच खरी सद्भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सहकार्य, शिस्त, संवेदनशीलता आणि मानवतेची मूल्ये जपावीत, असे आवाहन करण्यात आले. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे व्यक्तीला योग्य-अयोग्य यातील फरक समजण्यास मदत होते. तर्कशुद्ध विचार, निरीक्षण आणि पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे ही काळाची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांनी भारताच्या संगणक क्षेत्रातील स्वावलंबनाचा प्रेरणादायी प्रवास सांगितला. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता भारताने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा ध्यास घेतला. सी-डॅक च्या माध्यमातून डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेला ‘परम ८०००’ हा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा ठरला. असे त्यांनी सांगितले.
‘परम ८०००’ तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा