![]()
मोर्शी मोर्शीपासून जवळच असलेल्या डोंगर यावली येथील शेत शिवारातील एका विहिरीत ३३ वर्षीय युवकाचा मृतदेह शुक्रवारी (दि. २१) रात्री आढळला. सुरज अशोकराव चढोकर असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर डोंगर यावली येथील मृतकाच्या कुटुंबीयांसह सुमारे २५० ते ३०० महिला व ग्रामस्थांनी शनिवारी (दि. २२) मोर्शी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिसांच्या जुगारावरील कारवाईदरम्यान भीतीपोटी पळत असताना सुरज विहिरीत पडल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. ठाण्यावर धडकलेल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, २० ऑगस्टला रात्री बारा वाजताच्या सुमारास मोर्शी पोलिसांनी डोंगर यावली शेतशिवारात जुगारावर धाड टाकली होती. त्यावेळी पोलिसांच्या भीतीने पळून जात असताना सुरज विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे जुगारावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या संबंधित पोलीस पथकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. २० ऑगस्ट रोजी मोर्शी पोलिसांना डोंगर यावली शेत शिवारातील एका शेतात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री सुमारे १२ वाजताच्या दरम्यान घटनास्थळी छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर काही जण घटनास्थळावरून पळून गेले. ताब्यात घेतलेल्या जुगाऱ्यांकडे घटनास्थळावरून पळून गेलेल्या तरुणाबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते. या घटनेमुळे डोंगर यावली गावात पोलिसांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून, मृतकाच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी मोर्शी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. संबंधित पोलीस पथकावर कारवाई करावी आणि मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश पाटील, ठाणेदार राहुल आठवले, एपीआय वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. ठाण्यावर धडकलेले संतप्त नागरिक. आरोपांची सखोल चौकशी होणार ग्रामस्थांनी केलेल्या आरोपवजा तक्रारींची आम्ही सखोल चौकशी करणार आहे. तसे आश्वासन आम्ही ग्रामस्थांना दिले आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार केले आहेत. – राहुल आठवले, ठाणेदार मोर्शी.
Source link
तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह:मोर्शी ठाण्यावर धडकले डोंगर यावलीचे ग्रामस्थ