![]()
परळी तालुक्यातील खोडवासावरगाव तांडा येथे चुलत बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या वादातून एका तरुणाने आपल्या काका, काकू आणि आजोबांवर बंदुकीतून अंधाधुंद 3 ते 4 गोळ्या झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या गोळीबारात गोळी डाव्या डोळ्याला घासून गेल्याने आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. तक्रारदार व्यक्तीची मुलगी दोन-तीन वर्षांपूर्वी चुलत भावासोबत निघून गेली होती. या प्रकरणी ऑक्टोबर 2025 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान दोघे एकत्र राहत असल्याचे समोर आल्यानंतर, पोलिसांनी नोव्हेंबर 2025 मध्ये मुलीचा शोध घेऊन तिला पालकांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर मुलीने संबंधित तरुणासोबत न जाण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांनीही ‘चुलत बहीण असल्याने तुमचे लग्न होऊ शकत नाही’ असे सांगून दोघांची समजूत काढली. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला पुण्याला भावाकडे पाठवून दिले. याच रागातून तरुणाने यापूर्वीही मुलीच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या; त्याबाबत पोलिसांत तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. दरवाजावर झाडल्या गोळ्या; आजोबा जखमी दरम्यान, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30 वाजता मुलीचे वडील, आई आणि आजोबा घरासमोर बसले असताना आरोपी पुतण्या हातात बंदूक घेऊन त्यांच्या दिशेने आला. जीव वाचवण्यासाठी सर्वजण घरात पळाले आणि त्यांनी आतून दरवाजा लावून घेतला. त्यावेळी संतप्त तरुणाने बंदुकीतून दरवाजाच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या, ज्यामुळे लाकडी दरवाजा फुटला. यावेळी आजोबांनी नातवाला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर झाडलेली एक गोळी डाव्या डोळ्याला घासून गेली. यामुळे ते रक्ताळले आणि गंभीर जखमी झाले. मुलीला आणा, नाही तर पूर्ण घर उडवतो! आरोपी तरुणाने मोठ्याने ओरडून, “उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मुलीला माझ्याकडे आणून द्या, नाही तर तुमच्या पूर्ण कुटुंबाला जिवे मारून टाकीन!” अशी थेट धमकी दिली. गोळीबाराचा आवाज ऐकून तांड्यावरील नागरिक आणि नातेवाईक गोळा होऊ लागल्याने आरोपीने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. घटनेनंतर पीडित कुटुंबाने ‘डायल 112’ वर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
Source link
चुलत बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधातून पुतण्याचा काका-काकूंवर गोळीबार:गोळी डोळ्याला घासून गेल्याने आजोबा गंभीर जखमी, बीडमधील घटना