Headlines

गोंदिया जिल्ह्यात गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद:मध्य प्रदेश सीमेवर आढळले 50 सारस पक्षी




गोंदिया जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वार्षिक सारस पक्षी गणनेत 32 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. वनविभाग, गोंदिया आणि ‘सेवा’ संस्थेने स्थानिक नागरिकांच्या सहभागातून ही गणना यशस्वीरित्या पूर्ण केली. विदर्भाचे वैभव मानल्या जाणाऱ्या या देखण्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ही गणना महत्त्वाची मानली जाते. 20 जून 2026 रोजी गोंदिया जिल्ह्यातील 53 प्रमुख सारस पक्षी अधिवास क्षेत्रांमध्ये पहाटे 4:45 ते सकाळी 9:00 या वेळेत ही गणना करण्यात आली. यासाठी 35 सर्वेक्षण चमू स्थापन करण्यात आल्या होत्या, ज्यात वनविभागाचे कर्मचारी आणि प्रशिक्षित स्वयंसेवक असे सुमारे 150 जण सहभागी झाले होते. या गणनेदरम्यान शेजारच्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात 50 सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे. वाघ आणि वैनगंगा नद्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला भौगोलिकदृष्ट्या वेगळे करत असल्या तरी, या दोन्ही राज्यांच्या सीमाभागात सारस पक्ष्यांसाठी एक सलग आणि अनुकूल परिसंस्था निर्माण झाली आहे. अन्नाचा शोध, विश्रांती आणि प्रजननासाठी सारस पक्ष्यांचे जोडपे कोणत्याही प्रशासकीय सीमा न मानता दोन्ही राज्यांमध्ये मुक्त संचार करतात, असे निरीक्षण या गणनेदरम्यान नोंदवले गेले. गोंदिया जिल्ह्यातील गेल्या सहा वर्षांतील सारस पक्ष्यांच्या आकडेवारीत चढ-उतार दिसून आले आहेत. 2020 मध्ये 45 सारस पक्षी होते, जे 2021 मध्ये 39, 2022 मध्ये 34, 2023 मध्ये 31 आणि 2024 मध्ये 28 पर्यंत खाली आले होते. मात्र, 2025 मध्ये ही संख्या 30 झाली आणि आता 2026 मध्ये ती 32 वर पोहोचली आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेले संवर्धनाचे प्रयत्न हळूहळू यशस्वी होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते. गोंदियाचे जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले, उपवनसंरक्षक पवन जोंग आणि ‘सेवा’ संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. सारस पक्ष्यांच्या अधिवासाचे रक्षण करणे, त्यांच्या प्रजननासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि भविष्यातील संवर्धन धोरणे आखण्यासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. स्थानिक शेतकरी आणि ‘सारस मित्रांच्या’ संवेदनशीलतेमुळेच सारस पक्ष्यांचा अधिवास टिकून आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *