Headlines

गोकुळचा निर्णय काहींच्या पचनी पडला नाही, आता कोर्टच ठरवेल:संजय शिरसाट म्हणाले- एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही माझीही ठाम इच्छा




“शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता यांना आपले पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असे वाटणे यात गैर काहीच नाही; ती माझीही तीव्र इच्छा आहे आणि आमचा आग्रहही राहील. एकनाथ शिंदेंनी गेल्या अडीच वर्षांत स्वतःला झोकून देऊन ग्रामीण भागात जे काम उभे केले, त्यामुळे आजही प्रत्येक सामान्य माणसाच्या ओठांवर त्यांचेच नाव आहे,” असे परखड प्रतिपादन शिवसेना नेते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत यांच्या विधानांचा समाचार घेतला. यासोबतच महायुतीतील मुख्यमंत्रिपदाची चर्चा, गोकुळ दूध संघावरील कॅबिनेटचा निर्णय, 165 आश्रमशाळांमधील शिक्षकांचे रखडलेले प्रश्न, धनुष्यबाण चिन्ह आणि दुष्काळी उपाययोजनांवर शिरसाट यांनी सविस्तर भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या संपर्कात कोणीही नाही शिवसेनेत 3 गट पडले असून 2 गट ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या संजय राऊत यांच्या दाव्यावर शिरसाट यांनी जोरदार टोला लगावला. “शिवसेनेत कोणताही गट-तट नाही आणि कोणीही उद्धव ठाकरेंच्या संपर्कात नाही. केवळ राजकीय वातावरण निर्मिती करण्यासाठी अशी विधाने करणे हा संजय राऊतांचा धंदा झाला आहे.” आमदार सांभाळता आले नाहीत “जे मुख्यमंत्री असताना आपल्या आमदारांना सांभाळू शकले नाहीत, ते आता काय सांभाळणार? पक्षाचे राजकीय अस्तित्व संपायला आल्यानंतर ‘हमारा शेर अभी भी जिंदा है’ हे भासवण्यासाठी राऊत रोज अशा थापा मारत असतात.” मुख्यमंत्रिपदावरून महायुतीत कलह नाही “भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस किंवा सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री व्हावे असे म्हणतात, तशीच भावना शिवसैनिकांची एकनाथ शिंदेंबद्दल आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर असावा, याचा अर्थ महायुतीत खुर्ची ओढण्यासाठी भांडणे लागलीत असा बिलकूल होत नाही. महायुती पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने काम करत आहे.” गोकुळचा निर्णय काहींच्या पचनी पडला नाही; आता कोर्टच अंतिम निकाल देईल! गोकुळ दूध संघावर शासननियुक्त 4 संचालक नेमण्याच्या निर्णयावर सुरू असलेल्या वादावर शिरसाट यांनी वस्तुस्थिती मांडली. “गोकुळचे प्रकरण आता थोडे किचकट होत चालले आहे हे मान्य करावे लागेल. कालचा कॅबिनेटचा निर्णय काही लोकांच्या पचनी पडला आहे, तर काहींच्या पचनी पडलेला नाही. आता यावर न्यायालयाची लढाई सुरू होईल आणि अंतिम निकाल कोर्टातच होईल. त्यामुळे आम्ही सध्या ‘वेट अँड वॉच’च्या (Wait and Watch) भूमिकेत आहोत. सरकार आपल्या अधिकारांत निर्णय घेत असते. मात्र कोणताही निर्णय अंतिम नसतो; न्यायालय यावर काय भूमिका घेते, यावरच पुढील दिशा ठरेल.” 165 आश्रमशाळा आणि 4,000 कर्मचाऱ्यांचा प्रश्न सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीतील रखडलेल्या प्रश्नांवर मंत्री शिरसाट यांनी दिलासादायक घोषणा केली. “राज्यातील शाहू, फुले, आंबेडकर 165 आश्रमशाळांमधील सुमारे 4,000 शिक्षकांचा वेतनाचा आणि अनुदानाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे वय निघून गेले, तरी त्यांना हक्क मिळाला नाही. या कर्मचाऱ्यांची फाईल आम्ही वित्त विभागाकडे पाठवली असून ती मुख्यमंत्र्यांकडे जाईल. जरी वित्त विभागाने सुरुवातीला या प्रस्तावाला विरोध केला असला, तरी या 4,000 कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी हा प्रस्ताव थेट कॅबिनेट बैठकीत मांडणार असून पुढील 8 ते 15 दिवसांत तो मंजूर करून घेईन.” विभागातील इतर सुधारणा पदभार स्वीकारल्यापासून ‘स्वाधार योजने’च्या रकमेत वाढ केली, वसतिगृहांची संख्या वाढवली, 8,200 कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ दिली. जात पडताळणी समित्यांवर पूर्वी 4 लोक होते, ती संख्या आता 34 केली असून एमपीएससीमार्फत (MPSC) 39 नवीन अधिकाऱ्यांची भरती पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले. धनुष्यबाण आमचाच राहणार; सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूने लागेल! सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीवर विश्वास व्यक्त करताना शिरसाट म्हणाले, “निवडणूक आयोगाला आवश्यक असणारी घटनेची संपूर्ण चौकट आम्ही पूर्ण केली आहे. आमच्याकडे बहुसंख्य आमदार, खासदार आणि भक्कम सदस्य नोंदणी आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार, यात कोणतीही शंका नाही.” मूळ शिवसेना बाळासाहेबांची “आम्ही कधीही पक्ष सोडलेला नाही किंवा चोरलेला नाही; आम्ही मूळ शिवसैनिक असून बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी खरी शिवसेना आमचीच आहे. सर्वोच्च न्यायालय कायदेशीर आणि घटनात्मक बाबी तपासून आमच्याच बाजूने निकाल देईल.” शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर बोलताना ते म्हणाले, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाची 5,000 रुपयांची प्राथमिक मदत पोहोचली आहे. पुढील आठवड्यात सरकार दुष्काळाबाबत आणखी काही मोठे आणि ठोस निर्णय घेईल. शिवसेना पक्ष म्हणून यंदाची दिवाळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरी करत आहोत. शेतकऱ्यांना थेट शिधावाटप, महिलांना शिलाई मशिन्स आणि सायकलींचे वाटप केले जात आहे. तसेच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुढील 15 ते 20 दिवसांत पक्षाच्या वतीने दुष्काळग्रस्त गावोगावी थेट पाण्याच्या टँकर्सची सोय केली जाईल. —————————————————————————– हेही वाचा… गोवा-सुरतनंतर उदयपूरच्या मेरियटमध्ये लपवलेत गोकुळचे 12 संचालक: सतेज पाटील म्हणाले- पराभूतांना ‘तज्ज्ञ’ म्हणून मागील दाराने घुसवण्याचा गलिच्छ डाव “कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘गोकुळ’ दूध संघात आमच्या 13 जागा निवडून देऊन स्पष्ट जनादेश दिला आहे. मात्र जनतेने नाकारल्यानंतर आणि उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यामुळे सत्ताधारी महायुतीने गोकुळ ताब्यात घेण्यासाठी लोकशाहीचा उघड खून करणारा अध्यादेश काढला आहे. साखर कारखाने आणि जिल्हा बँकांना वगळून केवळ गोकुळवर डोळा ठेवून हा कायदा बदलण्यात आला. ज्या पराभूत उमेदवारांना साडेचार हजार मतदारांनी धुडकावून लावले, त्यांना आता ‘तज्ज्ञ’ म्हणून मागील दाराने (बॅकडोअर एंट्री) संचालक करून मताचा अधिकार देणे ही कसली लोकशाही? हा कसलाही डेडलॉक नसून महायुतीकडून थेट लोकशाहीच डेड (Dead) करण्याचा विकृत प्रयत्न सुरू आहे,” असा घणाघाती आरोप आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *