Headlines

गोकुळच्या मोर्चावर धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका:म्हणाले, मोर्चाला किती लोक येतील, याबाबत शंका




गोकुळ दूध संघातील शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीवरून कोल्हापूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहिती आहे. त्यांनी यापूर्वी अनेकदा केलेला उन्माद लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे उद्याच्या मोर्चाला नेमके किती लोक उपस्थित राहतील, याबाबत आपल्याला शंका असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे. गोकुळ दूध संघावर शासनाचा कब्जा करण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याचे स्पष्ट करत महाराष्ट्र सरकार गोकुळच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले. गोकुळचा कारभार सुरळीत चालावा आणि हा सहकारी दूध संघ अधिक नावारूपाला यावा, यासाठी सरकार आणि महायुती सकारात्मक भूमिका घेत असल्याचा दावा त्यांनी केला. तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले. ‘फेक नरेटिव्ह सेट करण्यात सतेज पाटील तरबेज’ गोकुळच्या सत्तेवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना महाडिक म्हणाले की, गोकुळमध्ये सत्ता वाटून घेण्याबाबत किंवा एकत्रितपणे कारभार करण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव आला असता, तर त्यावर निश्चित विचार केला असता. चेअरमनपदाची जबाबदारी काही वर्षे एका गटाकडे आणि उर्वरित काळ दुसऱ्या गटाकडे देण्याबाबत चर्चा झाली असती, तरी त्यातून मार्ग काढता आला असता. मात्र, अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव देण्याऐवजी केवळ तांत्रिक मुद्द्यांवरून आपल्याला अडवले जात असल्याचा आरोप करण्यात आला. सतेज पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात चुकीचा संदेश पसरवला असून, बहुमत आमच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, गोकुळमध्ये कोरम पूर्ण करण्यासाठी अद्याप एक जागा कमी असल्याचे महाडिक यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांचीच समन्वयाची भूमिका होती. आम्ही विरोधात बसणार असल्याचेही आधीच स्पष्ट केले होते. असे असताना विरोधकांकडून वेगळे चित्र निर्माण केले जात असल्याची टीका त्यांनी केली. फेक नरेटिव्ह तयार करण्यात सतेज पाटील तरबेज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ‘गोकुळ डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून ठरावधारकांनी वाचवला’ गोकुळच्या मालकी हक्कावर आणि भविष्यातील कारभारावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर आणखी एक गंभीर टीका केली. गोकुळ दूध संघाचे नाव बदलून तो डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून ठरावधारकांनी वाचवला, असा दावा त्यांनी केला. संबंधितांनी सहकारी साखर कारखान्याचे काय केले, हे सर्वांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी सतेज पाटील यांना लक्ष्य केले. सरकारला गोकुळवर कब्जा करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. उलट, महाराष्ट्र सरकार गोकुळच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दूध उत्पादकांचे हित आणि संघाची प्रगती यालाच प्राधान्य दिले जात असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. ‘दिवाळीत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये’ गोकुळच्या निर्णयाविरोधात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चावरही महाडिक यांनी प्रश्न उपस्थित केले. दिवाळीचा सण सुरू असताना आंदोलन आणि मोर्चामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा आंदोलनांचे आयोजन करताना त्याचा सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. उद्याच्या मोर्चाला नेमके किती लोक सहभागी होतील, याबाबत मला शंका आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीत मोठ्या संख्येने लोक जमवण्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे येथेही लाखोंच्या संख्येने लोक एकत्र आणण्याचे दावे केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात किती लोक उपस्थित राहतात, हे पाहावे लागेल, असे महाडिक म्हणाले. दिवाळीच्या काळात मोर्चा काढल्यामुळे बाजारपेठेतील व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकीय आंदोलन करताना सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. राजकारणासाठी नेमके काय निर्णय घ्यायचे, हा संबंधितांचा प्रश्न असला तरी कोल्हापूरकरांनी या सर्व गोष्टींचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. गोकुळच्या अध्यक्षपदाबाबत महाडिक म्हणाले… गोकुळच्या आगामी अध्यक्षपदाबाबतही धनंजय महाडिक यांनी महत्त्वाचे विधान केले. गोकुळवर नेमका कोणत्या गटाचा अध्यक्ष होईल, हे आताच सांगता येणार नाही. महायुतीचा अध्यक्ष होईल की समविचारी आघाडीचा, याबाबत सध्या निश्चितपणे काही सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासकीय संचालक हे अराजकीय असतील. तसेच निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांपैकी कोणालाही शासकीय संचालक म्हणून नियुक्त केले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या नियुक्त्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप केला जाणार नसल्याचा दावा महाडिक यांनी केला. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीचा संदर्भ देत महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. त्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्या ठरावधारकांची यादी तयार करण्यात आली होती. त्यांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्यामुळे अनेक संचालक नाराज झाले होते, असा आरोप त्यांनी केला. हेही वाचा…. गरज नसेल तर सरकारचे 5 हजार रुपये परत करा:मंत्री गिरीश महाजनांचे आवाहन, जळगावमधील विधानाने चर्चांना उधाण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी सरकारने त्यांच्या बँक खात्यांमध्ये 5 हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा केली आहे. मात्र, या मदतीवरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीची आवश्यकता नाही, त्यांनी सरकारकडून मिळालेले 5 हजार रुपये परत करावेत, असे आवाहन भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा होत आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *