Headlines

ग्राम सडक योजना; अंजनगाव बारीला नवे रूप:पार्डी-उतखेड रस्ता दुरुस्ती व पार्डी-वडगाव जिरे मार्गाचे रुंदीकरण‎




अंजनगाव बारी सर्कलमधील पार्डी (देवी), उतखेड, अऱ्हाड, कुऱ्हाड, वडगाव जिरे तसेच परिसरातील गावांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या रस्ते विकास कामांना अखेर गती मिळाली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पार्डी–वडगाव जिरे ग्रामीण मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण सुरू असून, पार्डी–उतखेड रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. पावसाळ्यात रेल्वे पुलाखाली पाणी साचणे, चिखल होणे, वाहतुकीस अडथळे निर्माण होणे ही समस्या या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. विशेषतः शालेय विद्यार्थी, शेतकरी, दैनंदिन प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसत होता. शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा, आपत्कालीन सेवा यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीबरोबरच काँक्रिटीकरण केले आहे. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही हाती घेतल्या आहेत. यामुळे भविष्यात पावसाळ्यातील गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. याचबरोबर ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे ५ किलोमीटर लांबीच्या पार्डी–वडगाव जिरे ग्रामीण मार्गाच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गाच्या विकासामुळे ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. शेती, शिक्षण, व्यापार, दैनंदिन वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. या दोन्ही विकासकामांसाठी नागरिकांनी आ. रवी राणा, रेल्वे प्रशासन व संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. विद्यार्थी, शेतकऱ्यांची गैरसोय टळणार ‘पार्डी–उतखेड रस्त्याच्या दुरुस्तीमुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांची अनेक वर्षांची गैरसोय दूर होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. – अक्षय मेश्राम, सरपंच, पार्डी (देवी)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *