Headlines

घाटीत एमआरआयसाठी एक महिन्याची प्रतीक्षा:रुग्णांची वाढती संख्या, सुट्ट्यांमध्येही सेवा सुरू राहणार




छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना आता एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत येथे केवळ 1 हजार रुपयांत ही सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे यंत्रणेवर ताण येत असून, ही प्रतीक्षा कमी करण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवशीही एमआरआय सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी रुग्णालयात एमआरआयसाठी 5 ते 10 हजार रुपये खर्च येतो, तर घाटीत तो अवघ्या १ हजार रुपयांत उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 50 टक्के सवलत मिळत असल्याने रुग्णांचा ओढा घाटीकडे वाढला आहे. सध्या घाटी रुग्णालयात रेडिओलॉजी विभाग, सुपरस्पेशालिटी विभाग आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एमआरआयची सुविधा उपलब्ध आहे. या तीन एमआरआय मशीन असूनही रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रतीक्षा यादी वाढत आहे. मराठवाड्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे घाटीतील एमआरआय विभागात दररोज सुमारे 90 एमआरआय तपासण्या केल्या जातात. रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले की, रेडिओलॉजीमध्ये 40, सुपरस्पेशालिटीमध्ये 25 ते 30 आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 25 अशा एकूण 90 तपासण्या होतात. एमआरआय ही तातडीची (इमर्जन्सी) सुविधा नसली तरी, ज्यांना त्वरित गरज आहे अशा रुग्णांना प्राधान्य दिले जाते. एमआरआय तपासणी मेंदूचे विकार (उदा. अर्धांगवायू, मेंदूतील गाठी, फिट्स), मणक्याचे आजार (उदा. कंबरदुखी, मणक्यातील गादी सरकणे) आणि सांधे व स्नायूंच्या समस्या (उदा. लिगामेंट इंज्युरी) तपासण्यासाठी आवश्यक असते. या समस्येवर उपाय म्हणून, घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले की, रुग्णालयातील तीन एमआरआय मशीनचे योग्य नियोजन करून सुट्ट्यांच्या दिवशीही एक मशीन सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. रेडिओलॉजी, सुपरस्पेशालिटी आणि कॅन्सर या तिन्ही ठिकाणी तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ. सुक्रे यांनी पुढे सांगितले की, एक विशेष मोहीम (ड्राइव्ह) राबवून ही प्रतीक्षा यादी कमी करावी लागणार आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर तपासणी मिळण्यास मदत होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *