Headlines

चांदीने सोन्यालाही टाकले मागे; वर्षात 40% उसळी:विटा-नाण्यांकडे 65% कल, एक लाखावरून घसरणीनंतरही तेजी कायम




पारंपरिक गुंतवणुकीत नेहमी सोन्याच्या सावलीत राहिलेल्या चांदीने चालू वर्षात सोन्याला परताव्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. एमसीएक्सच्या आकडेवारीनुसार, यंदा सोन्याने सुमारे ३०% परतावा दिला असताना चांदीने ४० टक्क्यांपेक्षा जास्त झेप घेतली आहे. उच्च पातळीवर झालेल्या नफेखोरीमुळे डिसेंबर फ्यूचर्समध्ये १.७२% ची घसरण होऊन भाव ९६,१७० प्रतिकिलोवर आले असले तरी बाजारातील दीर्घकालीन आघाडी कायम आहे. सौरऊर्जा (सोलार पॅनल), इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) आणि ५जी तंत्रज्ञानातील अनिवार्य वापरामुळे सलग चौथ्या वर्षी निर्माण झालेली जागतिक पुरवठा तूट ही दरवाढीचा मुख्य पाया ठरली आहे. परिणामी, ग्राहकांनी दागिन्यांपेक्षा थेट १ किलो व ५०० ग्रॅमचे बार, नाणी आणि सिल्व्हर ईटीएफकडे मोर्चा वळवला आहे. मुंबईतील प्रसिद्ध झवेरी बाजारात यंदा ग्राहकांच्या खरेदी पद्धतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे: समीकरण उलटले : मागील वर्षापर्यंत एकूण विक्रीत दागिन्यांचा वाटा ६०% आणि बार/नाण्यांचा ४०% होता. यंदा हे प्रमाण उलट होऊन ६० ते ६५% हिस्सा शुद्ध बार व नाण्यांच्या खरेदीचा झाला आहे. जुन्या चांदीचे पुनर्चक्रीकरण : घडणावळ वाचवण्यासाठी नागरिक घरातील जुनी भांडी व मोड मोडून ९९९ शुद्धतेचे बार सुरक्षित ठेवत आहेत. अशा व्यवहारांत ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. विक्रमी आयात : वाढती औद्योगिक व गुंतवणूक मागणी पूर्ण करण्यासाठी वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांतच देशात तब्बल ४,५०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त चांदीची आयात झाली आहे. कारागिरांना मिळाला नवा आधार सोन्याचे भाव आवाक्याबाहेर गेल्याने रोजगारासाठी पारंपरिक कारागीर आता चांदीच्या बारीक नक्षीकामाच्या दागिन्यांकडे वळत आहेत. नफा कमी असला तरी यामुळे कारागिरांची कला व उदरनिर्वाह सुरक्षित राहिला आहे. – कालिदास सिन्हा, अध्यक्ष, बंगाली स्वर्णशिल्पी कल्याण संघ चांदीतील नफेखोरी खूप वेगाने येते चांदीतील नफेखोरी खूप वेगाने येते. १ लाखावरून आलेली घसरण हेच स्पष्ट करते. सोनेचांदीत तीव्र चढ-उतार पचवण्याची तयारी हवी. – कुमार जैन, राष्ट्रीय प्रवक्ते, बॉम्बे बुलियन असोसिएशन अल्पकालीन घसरणीतही चांदीमध्ये दीर्घकालीन नफ्याची आहे मोठी संधी जागतिक बाजारातील चढ-उतार आणि नफेखोरीमुळे सध्या चांदीच्या दरात घसरण दिसते आहे. मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा धातू चांगल्या परताव्याची क्षमता बाळगतो, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. इलेक्ट्रिक वाहने, सौरऊर्जा आणि सेमी कंडक्टर चिप्सच्या वाढत्या वापरामुळे चांदीची औद्योगिक मागणी भक्कम राहिली असून बाजारात पुरवठ्याची तूट जाणवत आहे. सोन्याच्या तुलनेत चांदी अधिक अस्थिर असली, तरी ३ ते ५ वर्षांच्या चक्रात ती महागाईवर मात करणारा परतावा देऊ शकते. त्यामुळे प्रत्येक मोठी घसरण ही “एसआयपी’ किंवा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची उत्तम संधी ठरते. प्रत्यक्ष बार की सिल्व्हर ईटीएफ, कुठे करावी गुंतवणूक? Q चांदीतील चढ-उतार सोन्यापेक्षा जास्त का ?
A चांदी हा एकाच वेळी मौल्यवान धातू आणि महत्त्वाचा औद्योगिक कच्चा माल आहे. जागतिक उत्पादनापैकी ५५% पेक्षा जास्त वापर थेट उद्योगांमध्ये होतो. त्यामुळे आर्थिक मंदी किंवा नफेखोरीच्या काळात चांदीत सोन्यापेक्षा जास्त चढ-उतार दिसतात. Q प्रत्यक्ष बार/नाणी घ्यावीत की सिल्व्हर ईटीएफ?
A बार व नाणी (९९९ शुद्धता): प्रत्यक्ष ताबा आणि पूजेसाठी हे उत्तम पर्याय आहेत. मात्र, यासाठी बँक लॉकरचा खर्च, शुद्धतेची खात्री आणि चोरीची भीती असते. सिल्व्हर ईटीएफ : डिमॅट खात्याद्वारे अगदी १ ग्रॅमच्या पटीतही पारदर्शक खरेदी करता येते. घसरणीच्या दिवसांत टप्प्याटप्प्याने (SIP) गुंतवणूक करण्यासाठी ईटीएफ हा सर्वात सुरक्षित व सोयीस्कर मार्ग आहे. Q ९२५ स्टर्लिंग सिल्व्हर आणि ९९९ बारमध्ये काय फरक असतो?
A दागिन्यांमध्ये मजबुतीसाठी ९२.५% चांदी आणि ७.५% इतर धातू असतात (BIS 925 हॉलमार्क). हे विकताना १० ते २५% घडणावळ कापली जाते. याउलट, ९९९ बार हे ९९.९% शुद्ध गुंतवणुकीचे असतात, जे विकताना थेट चालू बाजारभाव मिळतो आणि नुकसान टळते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *