![]()
मनोज जरांगेंनी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या आॅडिओ क्लिपचे सत्य शोधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून एसआयटी स्थापन झाली आहे. १ सप्टेंबर २०२३ रोजी आंतरवालीत लाठीमारानंतर तत्कालीन जालना पोलिस अधीक्षक तुषार दोशींना हटवून या पदाची सूत्रे शैलेश बलकवडेंकडे देण्यात आली होती. तेच बलकवडे (सध्या द. प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त) ३ सदस्यीय एसआयटीचे प्रमुख असतील. पथकात पोलिस उपायुक्त विजयकांत सागर आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बजरंग बनसोडेंचा समावेश आहे. या क्लिपमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव आल्याने शिवसेना शिष्टमंडळ, जरांगे आणि भाजपनेही चौकशीची मागणी केली होती. ही क्लिप खरी असल्याचे जरांगेंनी म्हटले,तर एआयच्या मदतीने क्लिपमध्ये मोडतोड केल्याचा संशय शिवसेना, भाजपकडून केला जात आहे. फडणवीसांनी आतापर्यंत विविध प्रकरणात ११२ एसआयटी स्थापन केल्याचा दावा खा. संजय राऊत यांनी केला आहे. मराठा आंदोलन चिरडण्यासाठी दिल्लीतून निर्देश : जरांगे वडीगोद्री | मराठा आरक्षण आंदोलनाला लक्ष्य करण्यासाठी काही लोकांकडून नियोजन केले जात असून त्यामागे देशातील एखादा बडा नेता किंवा दिल्लीतून सूत्रे हलवणारी मोठी यंत्रणा असण्याची शक्यता आहे, असा आरोप करत या प्रकरणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. पडद्यामागे फडणवीसांना संपवण्याचा कट रचला जात होता. तो आम्ही उघडा पाडला आहे, असा दावाही जरांगे यांनी केला. बलकवडे ऑडिओ क्लिपचा पारदर्शक तपास करतील, असेही ते म्हणाले. राजकीय खेळी आणि पथकापुढे तांत्रिक आव्हान सरकारवर विशेषत: भाजपवर संशयाची सुई रोखली जाऊ नये आणि कारभारात पारदर्शकता दिसावी यासाठी तत्काळ एसआयटी स्थापन झाल्याचे दिसते. सूत्रांनी सांगितले की, ही ध्वनिफीत न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (एफएसएल) पाठवून ध्वनीलहरींचे विश्लेषण (व्हॉइस स्पेक्ट्रोग्राफी) केले जाईल. मूळ मानवी आवाजातील सूक्ष्म चढ-उतार आणि संगणकीय बनावट आवाज यातील फरक शोधणे हे सायबरतज्ज्ञांपुढील प्रमुख आव्हान असेल. ही ध्वनिफीत सर्वप्रथम कोणत्या भ्रमणध्वनीवर (मोबाइल) रेकॉर्ड झाली आणि ती कोणत्या समाजमाध्यमावरून किंवा खात्यावरून प्रसारित केली गेली याचा डिजिटल माग (आयपी ॲड्रेस) काढण्याचे काम सायबर पोलिसांना सोपवण्यात आले आहे.
Source link
‘500 कोटींच्या क्लिप’च्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन; सूत्रे बलकवडेंकडे:आंतरवालीत 3 वर्षांपूर्वी लाठीमारानंतर बलकवडेंकडेच एसपी पदाचा कार्यभार होता