![]()
‘मोबाइल, सोशल मीडियाच्या युगात तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. या व्यसनाधीनतेमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले असून, त्यांना वेळीच सुसंस्कारांचे बाळकडू देणे गरजेचे आहे. अशा शिबिरांमधून घडलेली सशक्त, व्यसनमुक्त चारित्र्यवान नवपिढीच भारताची खरी संपत्ती ठरेल,’ असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रमोद पोकळे यांनी केले. गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे आयोजित श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप झाला. या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी प्रमोद पोकळे यांनी उपस्थितांना आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने हात वर करून मी आयुष्यभर कधीही व्यसन करणार नाही. माझ्या संपर्कात येणाऱ्या मित्रांनाही व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देईन” अशी सामूहिक शपथ घेतली. श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार संस्थेद्वारे आयोजित या शिबिरात विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून १०३ शिबिरार्थी सहभागी झाले होते.समारोप कार्यक्रमात शिबिरार्थ्यांनी शिबिरात शिकलेल्या कलांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यामध्ये योगासने व प्राणायाम, लाठीकाठी व कराटे, लेझिम मल्लखांब प्रात्यक्षिकांनी उपस्थित पालकांची, मान्यवरांची मने जिंकली. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी केले, तर आभार प्रमोद पोकळे यांनी मानले. या सोहळ्याला आचार्य हरिभाऊ वेरूळकर, दिलीप लोखंडे, प्रल्हाद पारिसे, माधव सूर्यवंशी, रामदास चोरोडे, हभप नामदेव गव्हाळे, दिनकर चोरे, डॉ. नरेंद्र तराळे, गोपाल सालोडकर, श्रीकृष्ण बैलमारे कविता येनुरकर उपस्थित होते.
Source link
चारित्र्यवान व व्यसनमुक्त पिढीच देशाची खरी संपत्ती- प्रमोद पोकळे:राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे सुसंस्कार शिबिराचा समारोप