Headlines

‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सव 15 ते 18 नोव्हेंबरदरम्यान:41 चित्रपटांची मेजवानी, महसूल दुष्काळ निवारणासाठी देणार




मराठी चित्रपटसृष्टीला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह नवोदित चित्रपटकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवा’चे दुसरे पर्व 15 ते 18 नोव्हेंबर 2026 दरम्यान मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात रंगणार आहे. यंदाच्या महोत्सवात एकूण 41 मराठी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार असून, परिसंवाद, विशेष मुलाखती, मास्टरक्लासेस, लघुपट स्पर्धा आणि ‘पुस्तक ते सिनेमा’ यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महोत्सवातून मिळणारा महसूल राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. मराठी चित्रपटांना केवळ चित्रपटगृहे आणि पुरस्कारांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवून देणे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील आशयसमृद्ध आणि प्रयोगशील कलाकृतींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. 41 चित्रपटांचे प्रदर्शन; जुन्या अभिजात कलाकृतींचाही समावेश यंदाच्या महोत्सवात एकूण 41 मराठी चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यामध्ये 5 जुन्या अभिजात मराठी चित्रपटांचा समावेश असून, उर्वरित 36 चित्रपटांमध्ये नवीन, विविध चित्रपट महोत्सवांमध्ये नावाजलेले, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेले, प्रयोगशील तसेच अद्याप प्रदर्शित न झालेले चित्रपट असतील. सामाजिक प्रश्न, ऐतिहासिक विषय, ग्रामीण आणि शहरी जीवन, स्त्रीकेंद्री अनुभव, समकालीन आव्हाने आणि मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांवर आधारित चित्रपट या महोत्सवात सादर केले जाणार आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील आशयवैविध्य, कलात्मक सामर्थ्य आणि वेगवेगळ्या पिढ्यांमधील चित्रपटकर्त्यांचे योगदान प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठी चित्रपटांबद्दल देश-विदेशातील प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मराठी सिनेमाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे हक्काचे व्यासपीठ मिळावे, या विचारातून गेल्या वर्षी ‘चित्रपताका’ महोत्सव सुरू करण्यात आला. पहिल्या पर्वाला सिनेप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदा दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात येत असल्याचे ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. पहिल्या पर्वाला 7,500 प्रेक्षकांची उपस्थिती ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवा’चे पहिले पर्व एप्रिल 2025 मध्ये आयोजित करण्यात आले होते. महोत्सव सुरू होण्यापूर्वीच 2,000 हून अधिक प्रेक्षकांनी नोंदणी केली होती, तर संपूर्ण महोत्सवाला जवळपास 7,500 प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली होती. या प्रतिसादामुळे दुसरे पर्व अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे. मराठी चित्रपटांची समृद्ध परंपरा, आशयवैविध्य आणि कलात्मक गुणवत्ता अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सातत्य आवश्यक आहे. चित्रपटसृष्टीतील विविध घटक, माध्यम प्रतिनिधी, अभ्यासक आणि चित्रपट रसिक यांच्यात संवाद घडवून आणण्यासही हा महोत्सव उपयुक्त ठरेल, असा विश्वास मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला. 5 परिसंवाद, 5 मुलाखती आणि 5 मास्टरक्लासेस चित्रपट प्रदर्शनाबरोबरच यंदाच्या महोत्सवात 5 परिसंवाद, 5 विशेष मुलाखती आणि 5 मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर परिसंवादांमध्ये चर्चा होईल. चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या दिग्दर्शक, लेखक, अभिनेते आणि अन्य चित्रकर्मींच्या मुलाखतींतून त्यांचे अनुभव, विचार आणि कार्यप्रवास उलगडण्यात येणार आहे. चित्रपटनिर्मितीतील तांत्रिक बाबी, कलात्मक दृष्टिकोन आणि चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यांबाबत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मास्टरक्लासेस होणार आहेत. या उपक्रमांमुळे चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना तसेच नवोदित चित्रपटकर्त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. याशिवाय, मराठी चित्रपटसृष्टीच्या शतकोत्तर वाटचालीचा इतिहास आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी प्रवासाची माहिती देणारे विशेष प्रदर्शनही महोत्सवस्थळी भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनातून मराठी चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक प्रवास आणि चित्रनगरीचे योगदान उलगडले जाणार आहे. ‘पुस्तक ते सिनेमा’ उपक्रम ठरणार विशेष आकर्षण यंदाच्या महोत्सवातील महत्त्वाच्या उपक्रमांपैकी ‘पुस्तक ते सिनेमा’ अर्थात ‘बुक टू स्क्रीन’ हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरणार आहे. मराठीतील उत्तम कथाविषय असलेल्या आणि चित्रपटाच्या माध्यमातून सादर होण्याची क्षमता असलेल्या पुस्तकांच्या लेखकांना आणि प्रकाशकांना चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकार आणि निर्मिती संस्थांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. साहित्यकृतींचे चित्रपटांमध्ये रूपांतर व्हावे, तसेच लेखक आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये व्यावसायिक सहकार्याचे नवे मार्ग खुले व्हावेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासोबतच उत्तम कथांना दृश्य माध्यमातून व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो. ‘तरुणांच्या नजरेतून महाराष्ट्र’ लघुपट स्पर्धा नव्या पिढीतील चित्रपटकर्त्यांना संधी देण्यासाठी ‘तरुणांच्या नजरेतून महाराष्ट्र’ या विषयावर लघुपट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून नावीन्यपूर्णता, सर्जनशीलता आणि प्रभावी कथनशैली यांच्या आधारे 3 लघुपटांची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवात करण्यात येईल. या स्पर्धेमुळे तरुणांना महाराष्ट्राकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहण्याची आणि तो चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याची संधी मिळणार आहे. नवोदित दिग्दर्शक आणि लघुपट निर्मात्यांना आपल्या कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी हे व्यासपीठ उपयुक्त ठरणार आहे. महोत्सवाच्या महसुलातून दुष्काळग्रस्तांना मदत यंदाच्या महोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन महोत्सवाच्या आयोजनातून संकलित होणारा महसूल दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे. सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. महोत्सवाच्या चारही दिवसांसाठी प्रतिव्यक्ती नोंदणी शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे. या शुल्कातून जमा होणारा महसूल दुष्काळ निवारणाच्या कार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येईल. याशिवाय, दुष्काळग्रस्तांसाठी अतिरिक्त आर्थिक योगदान देऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘डोनर पास’ अर्थात ‘सामाजिक कृतज्ञता प्रवेशिका’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणताही विशेष डामडौल न करता चित्रपटकलेला प्राधान्य देऊन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासोबतच सामाजिक कार्यासाठी निधी उभारण्याचाही प्रयत्न या महोत्सवातून केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांना व्यासपीठ महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी महोत्सवाची संकल्पना, पहिल्या पर्वाला मिळालेला प्रतिसाद आणि यंदाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील असून, कान्स आणि इफ्फी यांसारख्या चित्रपट महोत्सवांमध्ये मराठी चित्रपटांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र महोत्सव आयोजित करून अधिकाधिक कलाकृतींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या विचारातून ‘चित्रपताका’ची संकल्पना पुढे आली. सांस्कृतिक कार्य विभागाच्या पाठबळामुळे हा उपक्रम आकाराला आल्याचेही त्यांनी नमूद केले. यंदाच्या महोत्सवाचे संचालक म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, तर क्युरेटर म्हणून सिनेअभ्यासक आणि दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे काम पाहणार आहेत. विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासांतील अधिकाऱ्यांनाही महोत्सवासाठी विशेष निमंत्रित करण्यात येणार आहे. महोत्सवातील विविध उपक्रम, नोंदणी प्रक्रिया आणि प्रेक्षकांसाठीच्या सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले असून, राज्यातील तसेच राज्याबाहेरील चित्रपटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. एकूणच, मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आशयप्रधान कलाकृतींना प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे, नव्या चित्रपटकर्त्यांना संधी देणे, साहित्य आणि चित्रपट यांच्यातील सहकार्य वाढविणे आणि दुष्काळग्रस्तांसाठी मदत उभी करणे, अशा विविध उद्देशांनी ‘चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवा’चे दुसरे पर्व आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे 15 ते 18 नोव्हेंबरदरम्यान होणारा हा महोत्सव मराठी चित्रपटप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. हेही वाचा… ‘जंगल तोडणारे तुम्हीच महाराष्ट्रद्रोही’:आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, कर्जतच्या प्रकल्पाला विरोध कायम रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्राची जंगलं नष्ट करणारे आणि आदिवासी पाडे उद्ध्वस्त करणारे तुम्हीच महाराष्ट्रद्रोही आहात,’ अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. विकासाला आमचा विरोध नाही; मात्र महाराष्ट्रातील जंगलांचा विनाश करून आणि स्थानिकांना विस्थापित करून विकास होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या वेळी खासदार संजय राऊत यांनीही पर्यावरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *