Headlines

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठी भाषा विकास केंद्र सुरु होणार:उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा; 10 कोटींचा निधी




उद्योग मंत्री उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हे केंद्र १० कोटी रुपये खर्चून उभारले जाईल. मराठी भाषेच्या विकासासाठी शासन पुढाकार घेत असल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत आणि साहित्यिकांसमवेत संवाद कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी आमदार विलास भुमरे, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव आणि भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गिते उपस्थित होते. बैठकीत साहित्यिक वि. रा. राठोड आणि गुलाबराव मगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मराठी भाषेच्या संवर्धनावर आपले विचार मांडले. यानंतर बोलताना मंत्री सामंत यांनी, मराठी भाषेचे संस्कार घरातूनच व्हायला हवेत, असे मत व्यक्त केले. लहान मुलांना ‘मम्मी-पप्पा’ ऐवजी ‘आई-बाबा’ म्हणायला शिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. शासनाच्या पातळीवर आता प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. ही कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालयात असतील आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी नियुक्त केला जाईल. या केंद्रासोबतच ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘कवितांचे गाव’ असे उपक्रम साहित्यिकांच्या गावी राबवून त्यांच्या स्मृती जागवल्या जातील. तसेच, युवा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन आणि बाल साहित्य संमेलन अशा विविध संमेलनांना चालना देण्यात येईल, असेही सामंत यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेहाडे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *