Headlines

जर जरी जर बक्ष यांच्या 740व्या उरुसासाठी प्रशासन झाले सज्ज:जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना अलर्ट मोडचा दिला आदेश‎




खुलताबाद ऐतिहासिक खुलताबाद नगरीतील हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन जर जरी जर बक्ष (रह.) यांच्या ७४० व्या उरूस यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत उरूसासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. बैठकीत उरूस व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा माजी नगराध्यक्ष ॲड. कैसरोद्दीन यांनी २४ तास शुद्ध पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, अखंडित वीजपुरवठा, आरोग्य पथके, अतिरिक्त एसटी बस सेवा, प्रशस्त वाहनतळ, भाविकांसाठी आवश्यक नागरी सुविधांचा प्रस्ताव प्रशासनासमोर मांडला. त्याची गंभीर दखल घेत सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नियोजन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील संवेदनशील भागांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे वाढवणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करणे, अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष ठेवणे, असे आदेश दिले. बैठकीस ग्रामीण पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार तथा उरूस व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गुट्टे, मुख्याधिकारी समीर शेख, नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, दर्गाह कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, उरूस व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यंदाचा ७४० वा उरूस सुरक्षित, शिस्तबद्ध, भाविकाभिमुख पद्धतीने यशस्वी करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला. हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचा दिला इशारा यंदा उरूस आणि पवित्र श्रावण महिना एकाच कालावधीत येत असल्याने भाविकांची व वाहनांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, पार्किंग आणि आपत्कालीन सेवांबाबत कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा सत्कार करताना मान्यवर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *