Headlines

जळगाव ड्रग्ज कनेक्शन यूपीपर्यंत, 200 कोटींचा मुद्देमाल केला जप्त:प्रयागराजमध्ये पोलिसांनी केली कारवाई, 21 तस्करांना बेड्या




​जळगावातून जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जच्या साठ्यावरून पोलिसांनी उत्तर प्रदेशात रॅकेटचा पर्दाफाश केला. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने प्रयागराजमध्ये धाड टाकून एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. आतापर्यंत २०० कोटींचा ७० किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. २१ तस्करांना अटक केली. या प्रकरणात गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून आतापर्यंत २१ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जळगावातील जप्तीनंतर हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्य ड्रग्ज पुरवठादार उत्तर प्रदेशातील रजनिश मिश्रा व शिवधन मिश्रा असल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ प्रयागराज गाठून मेजा तहसील हद्दीतील कोसाडा काला येथील शेतात धाड टाकली. तेथे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कारखान्यातून ५२ किलो ९३२ ग्रॅम एमडी आणि २६० लिटर घातक रसायने जप्त करण्यात आली. मुख्य सूत्रधार रजनिश मिश्रा व शिवधन मिश्रा या दोन्ही भावांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. ​तपास जळगावपर्यंत कसा पोहोचला? नालासोपारा येथे ३.३६ लाख रुपयांच्या एमडी ड्रग्जसह पकडलेल्या आरोपींच्या चौकशीतून मुंबईच्या कुर्ला भागातून हसीब सिद्दीकी उर्फ इजाज मर्चंट याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे तब्बल ११.८ किलो एमडी व १८.७० लाख रुपयांची रोकड हस्तगत झाली.​त्याच्या चौकशीत त्याने जळगावमध्ये एमडीचा साठा लपवून ठेवल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जळगावात धाड टाकून ४.९ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *