![]()
जामखेड-पाटोदा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने जामखेडहून पाटोद्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना साकत घाट मार्गाचा पर्यायी वापर करावा लागत आहे. मात्र, हा पर्यायी मार्गही आता अत्यंत दुरवस्थेत असल्याने वाहनचालकांना दररोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जामखेड ते बीड जिल्हा हद्दीपर्यंतचा सुमारे २० किलोमीटरचा रस्ता उखडला आहे. ठिकठिकाणी मरणप्राय मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच साकत घाटातील रस्ता अरुंद आणि धोकादायक बनला आहे. त्यामुळे या घाटातून वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांचेही नुकसान होत आहे. अहिल्यानगर आणि बीड या दोन जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ‘शॉर्टकट’ समजला जात असल्याने या मार्गावर अहोरात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, रस्ता दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या पार्श्वभूमीवर साकत घाटातील रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे आणि रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. या गंभीर प्रश्नाकडे जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधित प्रशासनाला कडक सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. तात्काळ दुरुस्ती सुरू न झाल्यास आंदोलन साकत घाटातील अरुंद आणि खड्डेमय रस्त्यामुळे दोन दिवसांपूर्वी एका प्रवासी वाहनाचा भीषण अपघात झाला होता. यात्रेकरूंनी भरलेली ही गाडी घाटात थेट पलटी झाली. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून २० जण किरकोळ जखमी झाले होते. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आता प्रशासनाला धारेवर धरत रस्ता दुरुस्ती तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Source link
जामखेड-पाटोदा महामार्गाचे काम रखडल्याने साकत घाटात मृत्यूचा प्रवास:अहिल्यानगर-बीड जिल्ह्याला जोडणारा शॉर्टकट बनला धोक्याचा