![]()
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसीच्या अखत्यारीतील रस्त्यांचा समावेश आहे. मुदतीनंतर रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल आणि खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित विभागावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक व्यवस्था, पावसाळ्यातील उपाययोजना आणि नदी-नाल्यांमधील अतिक्रमणांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता निलेश मोडवे, एमआयडीसीचे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार संजयकुमार मांगीलवार, पीएमआरडीएचे शिवकुमार गोपाल, चाकण वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गुलाब इनामदार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)चे अधीक्षक अभियंता प्रवीण सुमंत यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डुडी यांनी चाकण परिसरातील नदी, नाले आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमणे एका महिन्याच्या आत स्वखर्चाने काढून टाकण्याचे निर्देश दिले. मुदत संपल्यानंतरही अतिक्रमणे कायम राहिल्यास प्रशासनामार्फत ती हटवली जातील आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल. तसेच, प्रचलित कायदे व नियमांनुसार कारवाई केली जाईल. बैठकीत चाकण परिसरातील धोकादायक ठिकाणांचाही आढावा घेण्यात आला. वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक गतिरोधक काढून राष्ट्रीय रस्ते काँग्रेसच्या मानकांनुसार नवीन गतिरोधक उभारण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक, रस्ता चिन्हे, परावर्तक पट्ट्या आणि इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश दिले. तसेच, रस्त्यावर पार्किंग करणाऱ्यांवर नियमानुसार दंड आकारून रस्त्यावर कोणीही पार्किंग करणार नाही याची खात्री करण्याचे निर्देशही देण्यात आले. जिल्हाधिकारी डुडी यांनी सर्व यंत्रणांना रस्ते दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रस्त्यांवरील खड्डे आणि अतिक्रमणांच्या प्रश्नावर कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
Source link
जिल्हाधिकारी डुडींचे चाकण एमआयडीसी रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश:राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व पीएमआरडीएच्या रस्त्यांचा समावेश