Headlines

जिल्हा परिषदेत नशा करणाऱ्यांवर सीईओंची कारवाई:मिन्नू पी.एम. यांचा इशारा: पेन्शनही मिळणार नाही




जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसह कोणत्याही कार्यालयात नशा करून येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल आणि त्यांना पेन्शनही मिळू दिली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिला. स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य संजय निकम यांनी जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी नशा करून येतात, असा आरोप केला. काही कर्मचारी नियमित नशेत असतात आणि संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात, असेही निकम यांनी निदर्शनास आणले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी कार्यालयात येणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याने तंबाखू, गुटखा खाऊ नये किंवा नशा करू नये, असे स्पष्ट केले. असे आढळल्यास त्या कर्मचाऱ्याला पेन्शनही मिळू नये, अशी तरतूद केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या इशाऱ्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याच बैठकीत व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतली. समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. व्यसनमुक्ती अभियानाच्या पोस्टरचे अनावरण करून जनजागृती उपक्रमाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के यांच्या कार्याचे कौतुक केले. शासन आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांचा अनुभव असलेल्या सभापतींनी व्यसनमुक्तीच्या विषयावर प्रभावीपणे मनोगत व्यक्त केल्याचे गलांडे यांनी सांगितले. दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षणही यावेळी नोंदवण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *