![]()
सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मकोलॉजी (सीसीएमपी) परीक्षा उत्तीर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गुरुवारी रस्त्यावर उतरली. या आंदोलनामुळे अमरावतीतील ४०० हून अधिक रुग्णालये बेमुदत बंद ठेवण्यात आली, ज्यामुळे सुमारे २० हजार रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळू शकली नाही. आयएमएच्या सदस्यांनी सकाळी ११.३० वाजता इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ४०० हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. सीसीएमपी उत्तीर्ण डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) मध्ये नोंदणी करू नये, यासाठी आयएमएने यापूर्वीच न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही, न्यायालयाच्या अधीन राहून राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीची तयारी सुरू केली आहे. या प्रस्तावित निर्णयाला अमरावतीसह राज्यभरातील डॉक्टरांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. यापूर्वी, आयएमएने मंगळवारी २४ तासांचा बंद पाळून राज्य सरकारला इशारा दिला होता. मात्र, या इशाऱ्याची दखल न घेतल्याने बुधवारपासून राज्यभरातील डॉक्टरांनी ‘बेमुदत ओपीडी बंद’ आंदोलन सुरू केले आहे. याच बेमुदत बंददरम्यान गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आयएमएचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. वसंत लुंगे, अमरावती शाखेचे अध्यक्ष डॉ. दिनेश वाघाडे, सचिव डॉ. विक्रम वानखडे, कोषाध्यक्ष डॉ. रोहण बोबडे, माजी अध्यक्ष डॉ. अल्का कुथे आणि पीडीएमएमसीचे माजी अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले, जिथे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. आंदोलनकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. यापूर्वी, मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने मागणीचे निवेदनही सादर करण्यात आले होते. उपाध्यक्ष डॉ. तृप्ती दानखडे, सहसचिव डॉ. आशिष डगवार, पीआरओ डॉ. अक्षय चांदुरकर, डॉ. सिकंदर अडवाणी, डॉ. गौरव गोहाड आणि डॉ. नीलिमा ठाकरे यांसारखे इतर पदाधिकारीही आंदोलनात उपस्थित होते. याचदरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावरही गेल्या दोन दिवसांपासून आयएमएने तळ ठोकला असून, तेथील पदाधिकारी राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी सतत संपर्कात आहेत. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी कौन्सिलमध्ये नोंदणी देणे हे आधुनिक वैद्यकशास्त्राचा दर्जा, प्रामाणिकपणा आणि वैज्ञानिक आधाराला धक्का देणारे आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे आयएमएचे म्हणणे आहे. यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष झाल्यामुळे डॉक्टरांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
Source link
400 हॉस्पिटल बेमुदत बंद, 20 हजार रुग्णांची गैरसोय:आयएमएचा होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी परवानगीला विरोध