Headlines

जुन्नरमधील घरफोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला अटक:चार गुन्हे उघडकीस, 38 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त




जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे. ओतूर आणि नारायणगाव परिसरातील चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून सोने-चांदीचे दागिने, रोकड आणि कार असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसीम मुनीर पठाण (वय २९), अदनान युनूस पठाण (वय २६) आणि सोनू ऊर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख (वय ४०) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. चोरीचे चांदीचे दागिने विकत घेतल्याच्या आरोपावरून सागर अशोक शिंदे (वय ३०, रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी ओतूर पोलिस ठाण्यात घराचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने चोरल्याचा गुन्हा दाखल झाला होता. अशाच प्रकारच्या चोऱ्या ओतूर आणि नारायणगाव परिसरात झाल्याने पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळांवरील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात संशयित कार दिसून आल्यानंतर ओतूरपासून नाशिकपर्यंत तिचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासण्यात आले. नाशिकमधील इंदिरानगर आणि वडाळा परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे वाहनाचा शोध घेण्यात आला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांच्या पथकांनी वडाळा व लासलगाव परिसरात सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चार गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त मुद्देमालात दागिने, दोन लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेल्या कारचा समावेश आहे. गुन्हा करताना पकडले जाऊ नये यासाठी आरोपींनी वायरलेस वॉकीटॉकीचा वापर केल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या वॉकीटॉकीदेखील जप्त करण्यात आल्या असून, आरोपी पोलिस कोठडीत आहेत. पुढील तपास ओतूर पोलिस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *