![]()
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी (२७ मे) निष्कासित केले. ही कारवाई सलग तिसऱ्यांदा करण्यात आली असून, नव्याने उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड आणि ओटे जमीनदोस्त करण्यात आले. किलेअर्क परिसरातील महाविद्यालयाच्या सर्वे नंबर ३७२१ मधील जागेवर मर्दाना महाल, भूगोल विभागाची इमारत आणि विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान आहे. या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमणाचा विषय चर्चेत आहे. यापूर्वीही महापालिकेने दोन वेळा येथील अतिक्रमण हटवले होते. तरीही, पुन्हा पत्र्याचे शेड आणि पक्के ओटे बांधून अतिक्रमणाचा प्रयत्न सुरू होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळा निर्माण होत असल्याने, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. वैशाली देशमुख यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार दाखल करून अतिक्रमण हटवण्याची विनंती केली होती. डॉ. देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेत सोमवारी दुपारी अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी पोहोचले. कारवाईला सुरुवात करताच काही जणांनी विरोध करत ‘ही आमची जागा आहे’ असा दावा केला. मात्र, अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या अधिकृत परवानगीची विचारणा केली असता, संबंधितांना कोणतीही परवानगी दाखवता आली नाही. त्यामुळे, मनपा पथकाने जेसीबीच्या साहाय्याने अवघ्या दोन तासांत सर्व अनधिकृत शेड आणि ओटे जमीनदोस्त केले. या धडक मोहिमेत साहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई यांच्यासह नागरिक मित्र पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
Source link
ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण मनपाकडून जमीनदोस्त:सलग तिसऱ्यांदा कारवाई; दोन तासांत अनधिकृत शेड, ओटे पाडले