Headlines

ज्येष्ठांना नवदृष्टी अन् घरोघरी ग्रंथ वाटून विचारांची पेरणी‎:शहरात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, रक्तदान शिबिरे


.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंतीउत्सव शहरासह जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गांवरून डिजेंच्या दणदणाटात मिरवणूक मार्गस्थ झाली. त्यावेळी भीमगितांच्या तालावर निळे झेंडे फडकावत तरुणाईने ठेका धरला. फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून ५७ ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाली, तर डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचे महिलांना वाटप करण्यात आले. यंदाच्या जयंतीत सामाजिक व वैचारिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपमहापौर धनंजय गाडे, उत्सव समिती अध्यक्ष सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संजय खामकर आदींनी अभिवादन केले. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी त्रिसरण, पंचशील, भीमस्मरण व भीमस्तुती घेण्यात आली. तसेच भिंगार येथे मिनी मॅरेथॉनसोबतच रांगोळी, निबंध व चित्रकला स्पर्धाचे आयोजन केले होते. शहरात निघालेल्या मिरवणुकीत भिमगितांच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता. या मिरवणुकीत ११ मंडळांनी सहभाग नोंदवला. महामानवांच्या विचारांचा घरोघरी प्रसार करण्याच्या हेतुने पुस्तक वाटप उपक्रम राबव. त्यासाठी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस सुनील सकट यांनी पुढाकार घेतला. समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.

पुस्तकांद्वारे महामानवांचा विचारांचा घरोघरी प्रसार

मॅरेथॉनमधून संविधानाचा जागर भिंगार येथे मंगळवारी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संविधान, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा जागर करत युवक-युवतींसह शालेय विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. भीम जयंती उत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी, भिंगारतर्फे आयोजित या उपक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून ‘जय भीम’च्या घोषणांनी झाली.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शहरात ९ एप्रिलला गायक आनंद शिंदे यांच्या भीम गितांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच टाकळी काझी येथे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. हा कार्यक्रम सिद्धार्थ बौद्ध विहार येथे झाला. तसेच १२ एप्रिलला भिमगीतांचा कार्यक्रम झाला. तर मंगळवारी (१४ एप्रिल) सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *