![]()
अमरावती शहरात ५८ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना हेल्मेट सक्तीतून वगळण्यात यावे, अशी मागणी पुढे आली आहे. शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघांनी याबाबत पोलीस आणि आरटीओ प्रशासनाला निवेदने सादर केली आहेत. अमरावतीत २४ जुलैपासून हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. या सक्तीमुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक संघांच्या मते, साठी ओलांडलेल्या किंवा निवृत्त झालेल्या नागरिकांना विविध आजार असतात. त्यांचे स्नायूही काही प्रमाणात कमजोर झालेले असतात. अशा स्थितीत मानेवर हेल्मेटचे ओझे वाहणे त्यांच्यासाठी कठीण ठरते. याशिवाय, ज्येष्ठ नागरिक सहसा हळू वाहने चालवतात आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करतात. त्यामुळे त्यांच्याकडून अपघात होण्याची किंवा ते अपघाताला बळी पडण्याची शक्यता कमी असते, असा त्यांचा युक्तिवाद आहे. सध्या अमरावतीत अनेक रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागतो. प्रारंभी पोलीस प्रशासनाने ‘सक्ती नव्हे, अंमलबजावणी’ असे म्हटले होते. मात्र, आता हेल्मेट नसलेल्यांकडून थेट एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जात आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक धास्तावले आहेत. यापूर्वीही हेल्मेट सक्ती काही दिवस लागू होऊन नंतर बंद पडल्याचा अनुभव आहे, त्यामुळे उगाच खर्च करू नये, असेही त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात, अमरावती येथील विष्णू सोळंके यांनी म्हटले आहे की, “हेल्मेट सक्ती हा विषय सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षिततेसाठी असला तरी, अमरावती जिल्ह्यात तो सरकार बदलल्याप्रमाणे बदलताना दिसतो. आठ-दहा वर्षांपूर्वीही हेल्मेट सक्ती सुरू झाली होती, लोकांनी हेल्मेट खरेदी केले, पण सहा महिन्यांत हा विषय बंद पडला.” उमेश बनसोड यांनी शंका व्यक्त केली आहे की, “असा निर्णय एखाद्या मंत्री महोदय किंवा त्यांच्या मुलांना लाभ देण्यासाठी तर घेतला जात नाही ना? एखाद्या मंत्रीपुत्राच्या कारखान्यातील हेल्मेटची विक्री करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात नाही ना, अशी सर्वसामान्य माणसाच्या मनात शंका आहे. याबाबतही खुलासा होणे आवश्यक वाटते.”
Source link
ज्येष्ठ नागरिकांना हेल्मेट सक्तीतून वगळण्याची मागणी:अमरावतीत ज्येष्ठ नागरिक संघाचे पोलीस, आरटीओ प्रशासनाला साकडे