Headlines

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुन्हा 'पवार विरुद्ध पवार' संघर्ष!:राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम; सहकार क्षेत्रात दोन्ही गट पुन्हा आमनेसामने




राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाराष्ट्राने बारामतीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’ असा राजकीय संघर्ष पाहिला. मात्र, सुप्रिया सुळेंविरुद्ध उमेदवार देणे चूक होती, अशी कबुली देत यापुढे कुटुंबात राजकीय लढत होणार नाही, असे विधान अजित पवार यांनी केले होते. अजित पवारांच्या निधनानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही बारामतीत आमच्याकडून तरी अशी निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे हा संघर्ष पुन्हा एकदा अटळ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र या निवडणुकीच्या तयारीमुळे त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच पवार कुटुंबीय सहकार क्षेत्रातील या महत्त्वाच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसणार आहेत. दोन्ही गटांकडून पॅनेलची मोर्चेबांधणी या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपापले पॅनेल उभे करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी नुकत्याच सोमेश्वर कारखान्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. तर दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनीही आपल्या बाजूच्या इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. सहकार क्षेत्रातील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने दोन्ही गटांनी ती प्रतिष्ठेची केली आहे. मित्रपक्ष आणि स्वतंत्र लढण्याची तयारी या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना देखील उतरल्याने बारामतीच्या राजकारणात एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मित्रपक्षांसोबत मिळून ही निवडणूक लढवणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सुनेत्रा पवार यांच्यासोबत अद्याप युतीबाबत कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याची माहिती आहे. मात्र, युती झाली तर ठीक, अन्यथा स्वतंत्र पॅनेल उभे करून लढण्याची तयारी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी दर्शवली आहे. 30 सप्टेंबरच्या मुदतीकडे सर्वांचे लक्ष काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी चर्चेतून मार्ग काढून ही निवडणूक लढवू, अशी भूमिका मांडली होती. मात्र, प्रत्यक्षात तशी कोणतीही चर्चा अद्याप पुढे आलेली नाही. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे 30 तारखेपर्यंत चर्चेतून तोडगा निघून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही प्रयत्न होतात का, की पुन्हा एकदा बारामतीत जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *