Headlines

सांगलीच्या मिरजमध्ये सरकारी रुग्णालयाचा स्लॅब कोसळला:दोघांचा मृत्यू, 7 ते 8 जण गंभीर जखमी; बचावकार्य युद्धपातळीवर




मिरज शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येत असलेल्या नवीन कमानीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबले जाऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 7 ते 8 कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नेमकी दुर्घटना कशी घडली? मिळालेल्या माहितीनुसार, मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरील मुख्य प्रवेशद्वारावर एका नवीन कमानीची उभारणी केली जात होती. काही वेळापूर्वीच या कमानीवर स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, काम सुरू असतानाच अचानक हा स्लॅब कोसळला. कमान कोसळल्याचा आवाज इतका भयंकर होता की, परिसरात एकच खळबळ उडाली आणि मोठा गोंधळ निर्माण झाला. दोन जणांचा बळी, बचावकार्य युद्धपातळीवर स्लॅब कोसळल्याने त्याखाली अनेक कामगार अडकले. यात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुदैवाने, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 ते 6 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या दुर्घटनेत जवळपास 7 ते 8 कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस दल, अग्निशमन दलाचे बचाव पथक आणि रुग्णालय प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या जेसीबी मशिनच्या साहाय्याने स्लॅबचा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या अनपेक्षित घटनेमुळे रुग्णालयाच्या बाहेर नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कमानीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हेही वाचा.. जोगेश्वरीत विसर्जन कुंडात वीजप्रवाह पसरल्याने तरुणाचा मृत्यू:लालबाग परिसरातही गणेश मंडपाजवळ विजेचा धक्का लागून मुलगी आणि महिलेचा जीव गेला होता मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात आणखी एका व्यक्तीला विजेचा धक्का लागल्याची घटना समोर आली. ही घटना लिली व्हाइट इमारतीजवळील श्यामनगर तलावात दुपारी 12:20 वाजता घडली. येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी 5 कृत्रिम कुंड तयार करण्यात आले होते. त्यापैकी 4 कुंड मध्यरात्रीनंतर बंद करण्यात आले होते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *