Headlines

डिझेलसोबत पेट्रोलची लिंकींग:पेट्रोलपंप चालकांची तक्रार; जिल्हाधिकाऱ्यांच्या अत्यावश्‍यक सेवेसाठी इंधन देण्याच्या सूचना




हिंगोली जिल्ह्यात काही पेट्रोलपंपावर डिझेल देण्यासाठी कंपनीकडून पेट्रोलची लिंकींग केल्या जात असल्याची तक्रार काही पेट्रोलपंप चालकांनी शुक्रवारी ता. २९ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली आहे. जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवेसाठी तातडीने डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत. हिंगोली जिल्हयातील नालेगाव येथील एका गरोदर महिलेला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. केवळ इंधन नसल्याने रुग्णवाहिका मिळाली नसल्याने त्यांच्यावर वेळेवर उपचार झाले नाही. त्यामुळे बाळ दगावल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या पार्श्वभुमीवर आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, पेट्रोल विक्रेता संघटनेचे पदाधिकारी सुमीत चौधरी, कैलास बांगर, ललीत खुराणा, अजिंक्य देशपांडे, गोपाल चौधरी, राहुल नाईक, अनिल वर्मा, सुनील पाटील, राजू देशमुख, गणेश चौधरी यांच्यासह जिल्हयातील पेट्रोलपंप चालकांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी पेट्रोलपंप चालकांच्या अडचणी जाणून घेतल्या. खरीप हंगाम सुरु होत असून पेरणीपुर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यानंतर पेरणीला सुरवात होईल त्यासाठी ट्रॅक्टर चालकांना पेरणी व इतर कामांसाठी इंधन उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच रुग्णालयांना देखील इंधन द्यावे. सध्या विकास कामे सुरु असून यामध्ये प्रामुख्याने रोड व पुलांच्या कामाचा समावेश आहे. सदर कामे पावसाळ्यापुर्वी होणे आवश्‍यक आहेत त्यासाठी कंत्राटदारांनी त्यांच्या कामाबाबत आवश्‍यक कागदपत्रे दाखविल्यानंतर त्यांना तातडीने इंधन देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. दरम्यान, इंधन पुरवठा करणाऱ्या काही कंपन्यांकडून डिझेल देतांना पेट्रोल घेणे बंधनकारक करीत असल्याची तक्रार काही पेट्रोलपंप चालकांनी केली आहे. २० हजार लिटर डिझेल मागे ५ ते ८ हजार लिटर पेट्रोल दिले जात आहेत. डिझेलचा आवश्‍यक पुरवठा होत नसल्याची तक्रार करण्यात आली. या संदर्भात संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. तर काही जण विनाकारण त्रास देत असल्याची तक्रारही करण्यात आली. विनाकारण त्रास देणाऱ्यांविरुध्द तक्रार देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *