![]()
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी ता ३ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तब्बल तेरा जणांना चावा घेतला आहे. या मध्ये दोन बालकांचा समावेश असून यापैकी पाच जणांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे डोंगरकडा येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. या कुत्र्याने सुरुवातीला पाच कुत्र्यांना चावा घेतला आहे. त्यानंतर आज सकाळी दहा वाजल्यापासून या कुत्र्याने डोंगरकडा गावात चांगलाच उच्छाद मांडला. समोर दिसेल त्याला चावा घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळातच या कुत्र्याने तब्बल तेरा जणांना चावा घेऊन जखमी केले. यामध्ये दोन बालकांचाही समावेश आहे. कुत्र्याने चावा घेतल्यामुळे अडीच वर्षाचा शिवतेज गावंडे हा बालक गंभीर जखमी झाला. त्याच्या चेहऱ्यावर व अंगावर कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या जखमा आहेत. त्याला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय कुत्र्याने चावा घेतल्यामुळे जखमी झालेल्या इतर गावकऱ्यांमध्ये उमेश इंगोले, शेकुराव बुलबुले,जिहाद पठाण, सुरेश खंदारे,आरुष शंकर, विठ्ठल इंगोले यांचा समावेश आहे. याशिवाय तेलंगणातील परप्रांतीय साजन सिंग यांचा समावेश असून इतर पाच जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. पाच जणांना उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले असून त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान काही जखमींवर डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहे. दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Source link
डोंगरकड्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ:13 जणांना चावा, दोन लहान बालकांचा समावेश, गावात भीतीचे वातावरण