![]()
आपल्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच पहिल्या दिवसापासून ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या दोनच दिवसांत मुंढे यांनी अवैध गुटखा आणि भेसळखोरांविरुद्ध मोहिमेचा धडाका लावला असून, आता त्यांचा मोर्चा ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींकडे वळला आहे. ब्रँडच्या नावाखाली मोठमोठी आश्वासने देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर आता एफडीएची करडी नजर राहणार आहे. विशेष म्हणजे, केवळ उत्पादकच नव्हे, तर चुकीची माहिती देणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी होणारे जाहिरातदार आणि त्या उत्पादनाचा प्रचार करणारे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणजेच कलाकार यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी आणि खिशाशी खेळणाऱ्या कोणत्याही भ्रामक दाव्यांची आता खैर केली जाणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जबाबदारी निश्चित होणार उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांपासून ते जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक दुव्याची जबाबदारी आता निश्चित केली जाणार आहे. “ग्राहक संरक्षण ही आमची प्राथमिकता असून, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता खपवून घेतल्या जाणार नाहीत,” असा सज्जड दम मुंढे यांनी दिला आहे. तुकाराम मुंढे यांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. यंत्रणेला लावली शिस्त; राज्याभरात धाडसत्र तुकाराम मुंढे यांनी २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यानंतर भ्रष्टाचार आणि सुस्त कारभाराला चाप लावत सर्व विभागांतील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानंतर बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागांत एकाच वेळी धडक मोहीम राबवण्यात आली. आतापर्यंत २८ दुकाने सील करण्यात आली असून, ३३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अवैध गुटखा आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. हे ही वाचा… पुणे विषारी दारूकांडचे भिवंडी कनेक्शन उघड:तुकाराम मुंढेंच्या आदेशाने कंपनीचे गोदाम सील, 5,929 किलो मिथेनॉलचा साठा जप्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूमुळे १५ पेक्षा जास्त नागरिकांच्या झालेल्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, या प्रकरणाचे भिवंडी कनेक्शन समोर आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडमध्ये येत भिवंडीत धाड टाकून मिथेनॉलचा प्रचंड साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीचे गोदाम सील करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
Source link
तुकाराम मुंढे पॅटर्नचा धडाका:'मिसलीडिंग' जाहिराती देणारे ब्रँड आणि कलाकार रडारवर, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी मोठे पाऊल