Headlines

तुमचे काका मुख्यमंत्री असताना कारवाई का नाही केली?:मनसेच्या इशाऱ्यावर आशिष शेलारांचा पलटवार




महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवणारे अमराठी चालक आणि मराठी भाषेची सक्ती यावरून सध्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बोलणे सक्तीचे आहे. हा आमचा आग्रह असून हीच सरकारचीही भूमिका आहे,” असे शेलार यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले. अमराठी चालकांनाही शिकायचीय मराठी शेलार म्हणाले की, अनेक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची स्वतःहून मराठी शिकण्याची इच्छा आहे. महाराष्ट्रात सर्व भाषांचा सन्मान केला जातो आणि एका सलोख्याच्या वातावरणात काम चालते. याच वातावरणात, सरकारने मराठी भाषेला व्यावहारिक दृष्ट्या प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. अमराठी चालकांनीच स्वतःहून भाषेबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचेही शेलार यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे. कारवाई नाही, दिला वेळ या विषयावर बोलताना शेलार पुढे म्हणाले की, “काही लोकांची अशी विनंती होती की, त्यांना मराठी शिकायचे आहे, परंतु त्यासाठी त्यांना थोडा वेळ देण्यात यावा. त्यांच्या या विनंतीचा मान राखून सरकारने त्यांना भाषा अवगत करण्यासाठी वेळ दिला आहे. तसेच, या कालावधीत त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.” केवळ भाषेवरून वाद निर्माण न करता, अमराठी चालकांना मराठीच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने सामंजस्याची आणि त्यांना वेळ देण्याची भूमिका स्वीकारली असल्याचे यातून समोर आले आहे. अमित ठाकरेंना प्रत्युत्तर मराठी न बोलणाऱ्या अमराठी रिक्षाचालकांना बदडून काढण्याचा इशारा मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिला होता. यावर पलटवार करताना शेलार यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळावर बोट ठेवले. ते म्हणाले, “मराठीचा आग्रह आमचाही आहे. पण, तुमचे काका (उद्धव ठाकरे) जेव्हा अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी ही कारवाई का केली नाही? असे शेलार म्हणाले. आम्ही सर्वांना वेळ दिला आहे, त्यामुळे कुणीही कायदा हातात घेऊ नये.” नेपाळमधील पर्यटकांसाठी सरकारचे प्रयत्न नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत. यावर माहिती देताना आशिष शेलार म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार हे सर्वजण अडकलेल्या पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या सातत्याने संपर्कात आहेत. तिथे आवश्यक ती मदत आणि पथके पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कठीण आपत्तीच्या काळात, तिथे अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सरकार योग्य ते सर्व नियोजन करत आहे.” हेही वाचा.. मराठीपेक्षा सरकारला ‘यूपी’च्या निवडणुका महत्त्वाच्या?:मुदतवाढीवरून अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, चालकांना दिला मनसे स्टाईल कारवाईचा इशारा राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या वर्षभरात त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान या निर्णयाचा समाचार घेत फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *