Headlines

तुळजाभवानी देवीच्या 247 किलो सोन्यावरून पुन्हा वाद:प्रशासन म्हणते ‘अवमान नाही’, हिंदु जनजागृती समितीची नोटीस




श्रीतुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेले 247 किलो सोने आणि 3298 किलो चांदी वितळवण्याच्या प्रस्तावावरून वाद पुन्हा पेटला आहे. मंदिर प्रशासनाने सोने-चांदी वितळवण्यासाठी राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे नव्याने परवानगी मागितली आहे. मात्र, उच्च न्यायालयाने 2009 नंतरचे सोने वितळवण्यासंदर्भातील अर्ज यापूर्वी फेटाळला असताना पुन्हा प्रस्ताव पाठवणे हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितीने केला आहे. या प्रकरणी समितीच्या वतीने अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव आणि विधी व न्याय विभागाच्या सचिवांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजावली आहे. ठराव मागे न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात त्यांच्या वैयक्तिक क्षमतेत फौजदारी अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, मंदिर प्रशासनाने हा आरोप फेटाळला आहे. गुन्ह्यातील सोन्याला हात लावला जाणार नसून, त्याव्यतिरिक्त असलेले सोने-चांदी वितळवण्यासाठीच शासनाची परवानगी मागण्यात आली आहे, अशी भूमिका तुळजाभवानी देवस्थानच्या व्यवस्थापक माया माने यांनी स्पष्ट केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा समितीचा दाखला हिंदु जनजागृती समितीच्या म्हणण्यानुसार, 1 जानेवारी 2010 ते 10 जून 2023 या कालावधीत अर्पण झालेल्या सोने वितळवण्याची परवानगी मिळावी, यासाठी मंदिर संस्थानाने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, 23 जानेवारी 2025 रोजी न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने अंतरिम आदेशात बदल करणे योग्य ठरणार नाही, अशी न्यायालयाची भूमिका असल्याचे समितीने म्हटले आहे. त्यामुळे त्याच विषयावर नव्याने ठराव करून शासनाकडे परवानगी मागणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे असल्याचा समितीचा दावा आहे. प्रशासन मात्र सध्याचा प्रस्ताव न्यायालयीन प्रकरणातील सोन्याशी संबंधित नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे ‘प्रस्तावातील सोने नेमके कोणते आणि न्यायालयीन प्रकरणातील सोने त्यापासून कसे वेगळे आहे’, हा या वादातील प्रमुख मुद्दा ठरला आहे. सोन्याच्या मुकुटाच्या सत्यतेचा मुद्दा समितीने 8 डिसेंबर 2023 रोजीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही दाखला दिला आहे. मंदिरात भक्ताने अर्पण केलेला सोन्याचा मुकुट खरा नसल्याचे तपासणीत आढळल्याचा उल्लेख त्या आदेशात असल्याचे समितीचे म्हणणे आहे. तसेच मंदिरातील 71 प्राचीन नाणी, सोन्याचा मुकुट आणि मंगळसूत्र गायब असल्याचा दावा समितीने केला आहे. त्यामुळे उर्वरित सोने वितळल्यास जुन्या दागिन्यांची सत्यता तपासण्यासाठी आवश्यक पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याचे समितीने म्हटले आहे. मंदिरातील चोरी किंवा भ्रष्टाचाराबाबत समितीने केलेले हे आरोप आहेत. त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी या उपलब्ध माहितीत झालेली नाही. प्रशासनाचे म्हणणे काय? तुळजाभवानी देवस्थानच्या व्यवस्थापक माया माने यांनी समितीचा आरोप स्पष्टपणे फेटाळला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गुन्ह्यात दाखल असलेल्या सोन्याचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे आणि त्या सोन्याला कुणीही हात लावणार नाही. “गुन्ह्यातील सोन्याचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. त्याव्यतिरिक्त असलेले सोने-चांदी वितळवण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होण्याचा प्रश्नच नाही,” असे माने यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीवरूनही मतभेद समितीने आपल्या नोटिशीत सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचाही उल्लेख केला आहे. प्रशासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीचा आधार घेतला जात असल्याचा समितीचा दावा आहे. मात्र, संबंधित स्थगिती 8.50 कोटी रुपयांच्या कथित अपहाराच्या प्रकरणातील 16 दोषींवर गुन्हे दाखल करण्याच्या मुद्द्यापुरती मर्यादित असल्याचे समितीने म्हटले आहे. या स्थगितीचा सोने वितळवण्याच्या परवानगीशी संबंध नसून, त्यावर उच्च न्यायालयाचा आधीचा आदेश कायम असल्याचा समितीचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा प्रस्ताव आणि हिंदु जनजागृती समितीची कायदेशीर नोटीस यामुळे प्रकरण पुन्हा न्यायालयीन वादाच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. विधी व न्याय विभाग या प्रस्तावावर काय निर्णय घेतो, प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गुन्ह्यातील सोने वेगळे कसे ठेवले जाणार आणि समितीच्या आक्षेपांवर कायदेशीर पातळीवर काय भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे. ठराव मागे न घेतल्यास फौजदारी अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा समितीने दिल्याने तुळजाभवानी मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याचा मुद्दा आगामी काळात अधिक तापण्याची शक्यता आहे. हेही वाचा… अमृता वहिनींच्या भूमिकेचे स्वागत, पण फडणवीसांनी विष ओकणाऱ्या राणेंना आवरावे:जरांगे पाटलांचे आंदोलन सरकारच्या गळ्यात अडकलेली हड्डी- विजय वडेट्टीवार दांडियाबद्दल अमृता फडणवीस यांनी चांगला विचार मांडला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगून विष ओकणाऱ्या नीतेश राणेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढले तर त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *