![]()
पुण्यातील जुनी सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवासाठी उभारलेल्या स्टेजची लोखंडी कमान अंगावर पडल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता जुनी सांगवीतील लेन क्रमांक दोन येथे घडली. सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) असे मृत महिलेचे नाव आहे. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवीतील विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी दहीहंडी फोडण्यात आली. कार्यक्रम संपल्यानंतर स्टेज आणि त्यासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा उतरवण्याचे काम सुरू झाले होते. सलमा पठाण त्यांचे पती सलाउद्दीन पठाण यांच्यासोबत दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यावर त्यांच्या पतीने त्यांना घरी जाण्यासाठी बोलावले. त्या पतीच्या दिशेने परत येत असतानाच स्टेजची कमान उतरवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी कमानीचा लोखंडी अँगल अचानक त्यांच्या अंगावर पडला. या घटनेत सलमा गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर उपस्थित नागरिक आणि नातेवाइकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी औंध येथील रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उत्सवस्थळी गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, मृत महिलेचा मुलगा संबंधित दहीहंडी मंडळाचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे सलमा यांचे पती, मुलगा आणि अन्य नातेवाईकांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे. मंडळातील इतर तरुण अडचणीत येऊ नयेत, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कमान उतरवताना आवश्यक सुरक्षेची खबरदारी घेतली होती का, तसेच या घटनेला कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का, याचा तपास केला जात आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिली.
Source link
दहीहंडीच्या स्टेजची लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू:जुनी सांगवीत अकस्मात मृत्यूची नोंद, पोलिसांकडून तपास सुरू