![]()
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘निगेटीव्ह पॉइंट सिस्टीम’ लागू करण्याची घोषणा केली आहे. वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्या बेफिकीर चालकांवर यामुळे वचक बसेल. नागपूर येथील आयआयएममध्ये बोलताना गडकरी यांनी सांगितले की, रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त आणण्यासाठी सरकार नव्या कायदेशीर सुधारणांवर काम करत आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. या नव्या नियमानुसार, चालक जितक्या वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करेल, तितके निगेटिव्ह पॉइंट्स त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्स खात्यात जमा होतील. जर या पॉइंट्सची संख्या एका ठराविक मर्यादेच्या पुढे गेली, तर त्या चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा कायमस्वरूपी रद्द केले जाईल. यामुळे चालकांमध्ये शिस्त आणि जबाबदारीची भावना वाढेल. याच कार्यक्रमात गडकरी यांनी महामार्ग आणि खाण प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या हजारो चालकांसाठी ‘सुरक्षा’ या पायलट प्रकल्पाची सुरुवात केली. या उपक्रमात चालकांची मोफत डोळे तपासणी, वैद्यकीय चाचण्या आणि आरोग्य समुपदेशन केले जाईल. महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग-४४ च्या नागपूर-कामठी पट्ट्यापासून चंद्रपूरच्या खाण क्षेत्रापर्यंत १५० किलोमीटरच्या टप्प्यात हा प्रकल्प सुरुवातीला राबवला जात आहे. यामुळे लाखो चालकांना आरोग्य सुरक्षा मिळेल. याशिवाय, देशात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी खासगी दुचाकी आणि स्कुटी मालकांना ‘बाईक टॅक्सी’ म्हणून चालवण्याची परवानगी देण्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. यामुळे सुमारे आठ कोटी लोकांना रोजगाराची संधी मिळू शकते, असे गडकरी म्हणाले. त्यांनी सर्व राज्य सरकारांना या नियमाची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
Source link
रस्ते सुरक्षेसाठी ड्रायव्हिंग लायसन्सचा 'निगेटीव्ह पॉइंट' नियम:नियम मोडणाऱ्यांना वचक बसवण्यासाठी नितीन गडकरी यांची घोषणा