Headlines

मालाडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट:विटांचा कॉलम कोसळून 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ




महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात आणि गोविंदांच्या प्रचंड उत्साहात दहीहंडीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. ठिकठिकाणी 9 ते 10 थरांच्या मानवी मनोऱ्यांची सलामी पाहायला मिळत असून उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, उत्सवाच्या या आनंदी वातावरणात मुंबईतील मालाड येथील मालवणी भागात एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली असून, दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान एका सात वर्षीय चिमुकल्याला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. मालाड पश्चिमेकडील मार्वे रोडवरील चिकूवाडी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटीत शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास स्थानिक मुले स्वतःची दहीहंडी फोडत होती. या दहीहंडीची दोरी एका बाजूला झाडाला आणि दुसऱ्या बाजूला एका इमारतीच्या तळमजल्यावरील विटांच्या कच्च्या कॉलमला बांधण्यात आली होती. मुले दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच दोरीच्या ताणामुळे तो विटांचा कॉलम अचानक कोसळला आणि त्याखाली 7 वर्षीय रुद्र कदम हा मुलगा दबला गेला. या भीषण दुर्घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशासकीय व पोलिस कार्यवाही या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पालिकेचा वॉर्ड कंट्रोल रूम, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, संबंधित यंत्रणांकडून या घटनेची सविस्तर चौकशी आणि आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही सध्या केली जात आहे. सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर उत्सवाच्या दिवशीच घडलेल्या या मृत्यूमुळे संपूर्ण मालवणी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने सणासुदीच्या काळात सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. दहीहंडी किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक उत्सवादरम्यान असुरक्षित पद्धतींचा अवलंब करू नये आणि धोकादायक बांधकामांचा आधार घेऊ नये, जेणेकरून भविष्यात अशा निष्पाप जिवांचे बळी जाणार नाहीत, अशीच चर्चा आता सर्वत्र होत आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. पुण्यात दहीहंडी उत्सवानंतर भीषण दुर्घटना!:मंडपाची लोखंडी कमान उतरवताना रॉड डोक्यावर पडला; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी स्ट्रक्चर उतरवण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जुन्या सांगवी परिसरात घडली. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे नाव आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. इथे सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *